Ahmednagar News : शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून ४ लाख रूपये किंमतीचे डाळिंब अज्ञात भामट्यांनी चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील केसापूर येथे दिनांक ३० जुलै २०२३ रोजी उघडकीस आली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की बाबासाहेब तुकाराम पवार (वय ५३ वर्षे, रा. केसापुर, ता. राहुरी) यांची राहुरी तालूक्यातील केसापुर शिवारात शेत गट नं. ३४ / २ मध्ये अडीच एकर शेती आहे.
या शेतीमध्ये डाळिंबांची सुमारे ७५० झाडे लावलेली असून झाडाला लहान-मोठी तयार झालेली डाळिंबाची फळे होती. दिनांक ३० जुलै २०२३ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास बाबासाहेब पवार यांनी त्यांच्या डाळींबाच्या बागेत जावुन पहीले असता कोणीतरी अज्ञात भामट्याने ४ लाख रूपए किंमतीचे २०० कॅरेट डाळींबाची फळे चोरून नेल्याचे दिसले.
घटनेनंतर बाबासाहेब तुकाराम पवार यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ८३० / २०२३ नुसार भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.