राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट, ‘राष्ट्रवादी’चा उपोषणाचा इशारा

Ahmednagar News : जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम शहरात सुरू होत असून, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात यांनी केला आहे.

हे काम दर्जेदार करण्याच्या मागणीसाठी राळेभात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी १६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, की जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्ग-५४८ डी रस्त्याचे काम शहरात सुरू असून, हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे.

अंदाजपत्रकानुसार हे काम होत नाही. खोदकाम, भरई करताना दगड व माती मिश्रीत मुरूम वापरला आहे. गरज नसताना कोठारी पंप ते विचरणा नदी या सरळ रस्त्याला लहान वळणे दिली आहेत.

पर्यायी वाहतूक व्यवस्था न करता, रस्त्यांची खोदाई करून ट्रैफिक अडथळा येत आहे. संबंधित कामावर सरकारी अधिकाऱ्यांचे इन्स्पेक्शन होत नाही. त्या अधिकाऱ्यांना समज द्यावी, तसेच तज्ञ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम सुरू करावे.

मुरूम, खडी व काँक्रीटच्या नियमानुसार वापरले जाते की नाही, याची तपासणी करावी. रस्त्याच्या कामाचा वेग फार कमी आहे, प्रकल्पावर काम करताना निष्काळजीपणामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला, त्याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार, प्रोजेक्ट डायरेक्टर, प्रोजेक्ट मॅनेजर व शासकिय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,

रस्त्यावर वाहतुक कोंडी होत असल्याने एका बाजूचा रस्ता वाहतुकीस खुला केल्याशिवाय दुसरी बाजू उकरली जाऊ नये, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. तहसीलदार योगेश चंद्रे यांनी हे निवेदन स्वीकारले.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रेय वारे, शहाजी राळेभात, राजेंद्र पवार, अमित जाधव, कैलास हजारे, प्रशांत राळेभात, हरिभाऊ आजबे, राजू गोरे, प्रकाश काळे, राहुल आहेर, जयसिंग डोके, अवधूत पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते..