Ahmednagar News : कुकडी कॅनॉल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आग्रही मागणी बाबत गुरुवारी नगर येथे महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत पारनेर तालुक्यातील २९ पाणी वाटप संस्थांच्या प्रतिनिधींसह पाणी वापर संस्थाच्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीत कुकडी कॅनॉलच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची आग्रही मागणी असलेल्या पाट पाण्याचे आवर्तन १ मार्च रोजी सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. खासदार डॉ. सुजय विखे हे नुकतेच पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता,
पारनेर येथे या भागातील शेतकऱ्यांच्यावतीने सबंधित मागणी केल्यानंतर खा. विखे यांच्याच मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे विद्यमान सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली.
कोरडे म्हणाले कि, कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष या नात्याने नामदार विखे यांच्यासोबत सबंधित मिटिंगचे आयोजन करण्यात आलेले असून यावेळी विश्वनाथ येवले, दिलीप मदगे, नवनाथ सालके, शिवाजी चौधरी, शिवाजी डेरे, शांताराम चौधरी, शिवाजी सालके, संदीपराव सालके या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसह विविध पाणी वापर संस्थांचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.
पाणी आवर्तन सोडण्यास उशीर झाल्यास अगोदरच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस तोंड द्यावे लागेल. अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी वर्ग आवर्तन उशिरा सुटल्यास अधिकच अडचणीत येईल.
याबाबतची पालकमंत्री विखे पाटील यांना जाणीव झाल्याने १ मार्च पर्यंत कुकडी कॅनॉलला पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहणार असून सबंधित भागातील शेतकऱ्यांनी निश्चित राहावे, असा विश्वासही मंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.