Ahilyanagar News : शनिवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा ३३ के.व्ही. लाईनच्या शिगवे, एकरूखे व पुणतांबा येथे मेंटेनन्स कामासाठी सलग ९ तास खंडित करण्यात आला होता. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे वीज खंडित झाल्याने घरातील व बाहेर काम करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहे.
महावितरणकडून वीजपुरवठा शनिवारी खंडित होणार असल्याची पूर्वसूचना शुक्रवारी सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपवर महावितरण कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली होती. या मेंटेनन्स कामांतर्गत विद्युत उपकरणांची दुरुस्ती, विद्युत खांबावरील खाली आलेल्या तारा, रस्त्यावरील विद्युत तारेवर आलेल्या झाडांच्या फांद्या काढणे, काही ठिकाणी वाकलेले विद्युत खांब सरळ करणे आणि अडॉप्टरची दुरुस्ती यांसारखी कामे करण्यात आली, अशी माहिती उपअभियंता शितल कुमार जाधव यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून पुणतांबा व परिसरात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली होती. विविध भागांमध्ये वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनुसार, वीज खंडित होण्यामागची प्रमुख कारणे म्हणजे तांत्रिक बिघाड, पुणतांबा सबस्टेशन येथील जुने व जड झालेले विद्युत उपकरण वारंवार बिघडणे व त्यामुळे दुरुस्तीस लागणारा वेळ.
नियोजित देखभाल व दुरुस्ती कामांमुळेही ठराविक वेळेस वीज बंद ठेवली जाते. तसेच, विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळणे, जुनी व जीर्ण झाडे किंवा मोठ्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्यामुळेही वीज खंडित होते. अति भार वाढ झाल्याने, म्हणजे उन्हाळ्यात एसी, कुलर, पंखा यांसारख्या उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याने वितरण व्यवस्थेवर ताण येतो.
महावितरणने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आल्याचे उपअभियंता शितल कुमार जाधव यांनी स्पष्ट केले. सलग ९ तास मेंटेनन्सचे काम झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.