अहिल्यानगर : जिल्ह्यातील विविध भागात यंदा गावरान आंब्याला चांगला मोहोर आलेला आहे. परिणामी ठिकठिकाणी आता झाडांना कैऱ्या लागल्या आहेत. यंदा आंब्याचे उत्पादन चांगले मिळण्याची शक्यता असल्याने आंबा उत्पादकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. चोखंदळ खवय्यांनाही यंदा गावरान आंब्याचा गोडवा चाखण्यास मिळणार आहे.
ग्रामीण भागात अनेक शेतशिवारात आंब्याची मोठमोठी झाडे दिमाखात उभी आहेत. या झाडांना चांगल्या प्रमाणावर मोहर बहरला आहे.शिवाय कैऱ्याही चांगल्याप्रकारे लागण्यास सुरुवात झाली आहे. सध्या मोजक्यात शेतकऱ्यांकडे गावरान आंब्याची झाडे आहेत. गेल्या काही दिवसापासून कडक उन्हामुळे फळगळतीही होत आहे. काही शेतकऱ्यांनी नवीन जातीच्या आंब्याची झाडे लावली आहेत.

ही झाडे आकाराने लहान व उंचीला देखील कमी असतात. उन्हाळ्यात गावरान आंब्याची मागणी होत असल्याने हमखास उत्पन्न मिळते. यावर्षी गावरान आंब्याच्या झाडांना मोहोर चांगला लागला आहे. त्यामुळे यावर्षी गावरान आंब्याचा गोडवा चाखायला मिळणार आहे.
ग्रामीण भागात पूर्वी आंब्याच्या आमराया असत. तेथे मोठ्या प्रमाणावर गावरान आंबा असे. मात्र, आता वृक्षतोडीमुळे आमरायाही नष्ट झाल्या आहेत. शेतशिवारात आंब्याची लागवड अनेक जण करत आहेत. यात साधारणपणे केशर आंब्याला प्राधान्य दिले जाते. ग्रामीण भागातील गावरान आंब्याची झाडे मोजकीच राहिली आहेत. परिणामी उत्पादनात घट झाल्याचे दिसत आहे.