सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांसाठी‌ प्रस्ताव सादर करावेत – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

Published on -

अहिल्यानगर दि. ७ – नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी व शनिशिंगणापूर येथे निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक निधीसह प्रस्ताव प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.आशिया बोलत होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे हे प्रत्यक्ष तर संबंधित यंत्रणांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, उत्तर प्रदेशात कुंभ निमित्ताने धार्मिक पर्यटनात वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक सोबत जिल्ह्यातील शिर्डी व शनिशिंगणापूर येथील धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने धार्मिक स्थळांना जोडणारी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी रेल्वेस्थानक, रस्ते, विमानतळ सुविधांच्या सुधारणेवर भर द्यावा. या ठिकाणच्या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावेत.

पर्यटकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आवश्यक सुविधांची निर्मिती करावी. आरोग्य सुविधा, सुरक्षा विषयक उपाययोजना, स्वच्छतागृह, प्रमुख रस्ते, परिसर सुशोभीकरण, पोलीस मदत केंद्रे आदी व्यवस्थेचे नियोजन करावे. शिर्डी येथे वाहनांची गर्दी न होता वाहतुक सुरळीत होण्यासाठी पर्यायी रस्त्यांची निर्मिती, बाह्यवळण रस्त्यांसाठी चाचपणी करावी. रस्त्यांचे व उड्डाणपुलांचे सुरक्षा परीक्षण करुन घेण्यात यावे. शहरातील बायपास रस्ता व परिक्रमा मार्गाचा शिर्डी संस्थानने प्रस्ताव सादर करावा. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आवश्यक साहित्याचाही प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करावी. त्याचबरोबर आवश्यक असलेल्या रस्त्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. येणाऱ्या भाविकांसाठी पुरेशा प्रमाणात पार्किंग व्यवस्था, पाणी, विद्यूत पुरवठा, वैद्यकीय सेवा, वाहतूक व्यवस्था, हेलिपॅड तसेच गावांतर्गत रस्ते व स्ट्रीटलाईट उभारणीसाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe