Ahmednagar News : यंदा जून महिन्यांपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामासाठी १२० टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झाली. वेळेवर पाऊस येत राहिल्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, बाजरी, मुग, उडीद आदी पिके बहारदार आली आहेत.
सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यास आणि धरणे शंभर टक्के भरल्यास रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची शाश्वती मिळते. यंदा धरणे ओव्हरफ्लो झाली. सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे भूजलपातळी वाढून रब्बी हंगामासाठी वातावरण अनुकूल असणार आहे.
त्यामुळे बळीराजा आनंदात आहे. खरीप पिके निघताच शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागणार आहेत. त्यासाठी कृषी विभागाने रब्बी पिकांसाठी हेक्टरी क्षेत्राचे नियोजन केले आहे. गेल्या वर्षर्षीपेक्षा यंदा ज्वारीचे क्षेत्र कमी असणार आहे. गेल्या वर्षी गव्हासाठी १ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्र होते. यंदा २ हजार हेक्टर क्षेत्र वाढणार आहे.
त्यानुसार कृषी विभागाने जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी ४ लाख ५३ हजार ८६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. ज्वारीसाठी १ लाख ९० हजार तर गहू पिकांसाठी १ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रांवर पेरणी होणार आहे.
जिल्ह्यात आजमितीस १२० टक्के पावसाची नोंद झाली असून, धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. गेल्या वर्षी २०२३-२४ रब्बी हंगामासाठी ४ लाख ४९ हजार १६२ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले होते. यंदा यामध्ये ४ हजार ७०५ हेक्टर क्षेत्राची वाढ करण्यात आली आहे.
यंदा गेल्यावर्षीपेक्षा ज्वारीचे क्षेत्र कमी राहील तर मका, हरभरा, गव्हाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज मांडला आहे. असे असले तरी गेल्यावर्षीपेक्षा यंदा पावसाची स्थिती चांगली आहे. त्यामुळे यंदा रब्बीत पेरणी क्षेत्र वाढू शकते.
नगर जिल्ह्यात एखादा अपवाद वगळता सर्व धरणे भरली आहेत. पाण्याचा स्रोत चांगला उपलब्ध असू शकतो. शिवाय अजून परतीचा पाऊस सुरु झालेल्या नाही. त्यामुळे तो पाऊस कसा होतो यावर देखील बरीच गणिते अवलंबून आहेत.