राहुरी : १० नंतर डीजे वाजवला तर थेट ५ लाखांचा दंड आणि ६ महिने जेल

Published on -

राहुरी : राज्य शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत प्रशासनाने ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. यासंदर्भात नुकतीच एक बैठक घेण्यात आली, ज्यात मंगल कार्यालय आणि लॉन्स मालक, डीजे व साऊंड सिस्टीम व्यावसायिक, उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुंजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पोलिसांनी स्पष्ट केले की, रात्री १० नंतर डीजे किंवा लाऊडस्पीकर वाजवल्यास ५ लाख रुपयांचा दंड आणि ६ महिन्यांची शिक्षा होऊ शकते. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक असून, रात्री १० ते पहाटे ६ या वेळेत कोणत्याही प्रकारचे ध्वनिप्रदूषण करणे प्रतिबंधित आहे.

या बैठकीत मंगल कार्यालय आणि लॉन्स चालकांना चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर सुरक्षित ठिकाणी ठेवावे, जेणेकरून त्यांची तोडफोड किंवा छेडछाड होणार नाही, असेही सांगण्यात आले.

डीजे, लाऊडस्पीकर आणि इतर वाद्यांबाबत नियमावलीचे सविस्तर वाचन करण्यात आले. कोणत्याही वाद्याचा वापर करण्यापूर्वी पोलिस प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. परवानगीशिवाय वाद्य वाजवून ध्वनिप्रदूषण केल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला.

विशेषतः रात्री १० नंतर डीजे वाजवल्यास कठोर दंड आणि शिक्षेची तरतूद असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या नियमांचे काटेकोर पालन करून ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe