श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) येथे एका रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून,
आरोपी रेल्वे पोलिस ज्ञानदेव आढाव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे करत आहेत.

महिलेच्या फिर्यादीनुसार, ती श्रीरामपूर येथे आली असताना आरोपी ज्ञानदेव आढाव याने तिच्याशी संपर्क साधला. त्याने स्वतःला रेल्वे खात्यातील पोलिस कर्मचारी असल्याचे सांगून, “मी तुला नोकरी लावून देतो,” असे आमिष दाखवले.
विश्वासात घेण्यासाठी त्याने महिलेचा मोबाइल क्रमांक घेतला आणि वेळोवेळी संदेश पाठवत राहिला. या बहाण्याने त्याने महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेमुळे त्रस्त झालेल्या महिलेने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पीडितेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ज्ञानदेव आढाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अत्याचारासह अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवल्याने या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली असून, या घटनेच्या सर्व पैलूंची चौकशी सुरू आहे.