Ahmednagar News : शनिवारी रात्री हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धरणात पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात आवक झाली. पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर आणि रतनवाडीत अक्षरशः धो-धो पाऊस कोसळ आहे.
आषाढ सरी तुफानी बरसत असल्याने डोंगरदऱ्यांमधून धबधबे आक्राळ विक्राळ रूप धारण करत कोसळत आहेत. त्यामुळे एक परिसरातील ओढे नाल्यांना पूर आला आहे. भातखाचरे देखील तुडुंब झाली आहेत. सर्वत्र पाणीच पाणी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शुक्रवारी रात्री घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत पावसाची जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे रविवारी सकाळी ६ वाजता अकोले तालुक्यातील कुरकुंडी नदीवरील १५५ दलघफू पाणीसाठा क्षमतेचे शिरपंजे-देवहंडी लघुपाटबंधारे जलाशय पूर्ण क्षमतेने भरला. यंदाच्या पावसाळ्यात ओव्हर फ्लो झालेले हे चौथे जलाशय आहे.
अकोले तालुक्यात शनिवारपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. यात भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघरला मागील २४ तासांत तब्बल ९ इंचाहून अधिक, तर रतनवाडी परिसरात ८ इंचाहून अधिक पाऊस झाला.
रविवारी सकाळी अकोले तालुक्यातील कुरकुंडी नदीवरील १५५ दलघफू पाणीसाठा क्षमतेचे शिरपंजे-देवहंडी लघुपाटबंधारे जलाशय पूर्ण क्षमतेने भरला. यंदाच्या पावसाळ्यात ओव्हर फ्लो झालेले हे चौथे जलाशय आहे.
सर्वप्रथम मुळा नदीवरील अंबित व पिंपळगाव खांड, नंतर कृष्णावंती नदीवरील वाकी व आता कुरकुंडी नदीवरील शिरपंजे-देवहंडी जलाशय पूर्ण भरले. शनिवारपासून सह्याद्री पर्वत रांगेत संततधार पाऊस सुरू आहे. परिसरातील कातळ कड्यांवरून असंख्य धबधबे खळाळत जमिनीवर कोसळत आहेत.
या धबधब्यांना कवेत घेण्याचे व डोळ्यांत सामावून घेण्याचे प्रयत्न निसर्गप्रेमी करत आहेत. मागील २४ तासांतील भंडारदरा भंडारदरा ३५, घाटघर २३०, पांजरे १९९, रतनवाडी पाणलोट क्षेत्रातील पाऊस २०५, तर निळवंडे धरणावर २७, आढळा धरणावर १० व अकोल्यात १७ मिमी पाऊस झाला.
भंडारदरा धरणात २४ तासांत तब्बल ४६३ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. कृष्णावंती नदीवरील वाकी जलाशयातून ५५६ क्युसेक्सने कृष्णावंती नदीत ओव्हर फ्लो सुरू आहे.
त्यातील २० दशलक्ष घनफूट पाणी व भंडारदऱ्यातील हायड्रो क्रमांक दोनमधून वीज निर्मितीनंतर २३२१ क्युसेकने पाणी निळवंडे धरणात येत असून, २४ तासांत निळवंडे धरणात १४७ दशलक्ष घनफूट नवीन पाणी वाहून आले. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा ८७४ दलघफूट (१०.४९ टक्के) झाला होता.
देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा ४३० (४०.५७ टक्के) दशलक्ष घनफूट झाला आहे.