Ahmednagar News : कळसूबाई शिखरावर पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णावंती नदीला आलेल्या प्रचंड पुराने वाकी धरण शुक्रवारी (दि. ७) रात्री ९ वाजता पूर्ण क्षमतेने भरले. कृष्णावती नदीमधून निळवंडे धरणाच्या दिशेने पाणी झेपावले असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच आहे.
अकोले तालुक्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसूबाई शिखरावर गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे कृष्णावंती नदीला पुर आला, तर कृष्णावंती नदीवर असणारा ११२.६६ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या लघु बंधाऱ्याला गुरुवारीच भरण्याचे वेध लागले होते. आज मात्र सकाळपासून मुसळधार पडत असलेल्या पावसाने कृष्णावंती धोक्याच्या पातळीवरुन वाहती झाल्याने रात्री ९ वाजता वाकी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले.
वाकी धरण भरुन वाहु लागल्यामुळे निळवंडे धरणात आता मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढणार आहे. संध्याकाळनंतर कृष्णावती नदी ७८९ क्युसेक्सने वाकी धरणावरुन वाहत होती. भंडारदरा धरणाच्या पाणलोटातही मुसळधार पाऊस पडत असल्याने आदिवासी बांधवांची भात खाचरे तुडुंब भरल्याने भातरोपे पाण्याखाली गेली आहेत.
उडदावणे येथील काळु नदीला पुर आल्याने पुराचे पाणी पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती, तर अनेक धबधबे धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने वनविभागाकडुन दखल घेतली जात आहे. शुक्रवारी सकाळी मात्र भंडारदरा पाणलोटात व कळसुबाई भागात पावसाने कहरच केला.
सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने कोल्हार घोटी राजमार्गावरही वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तर शेंडीच्या बाजारातही पावसामुळे बाजारकरूंचे हाल झाले. गत २४ तासात भंडारदरा येथे १३७ मीमी पावसाची नोंद झाली. रतनवाडी १५५ मीमी, घाटघर १४५ मीमी तर वाकी येथे १२७ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
पांजरे येथे १३० मीमी पाऊस पडला. तर २४ तासात भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ६३५० दलघफुट झाला असुन भंडारदरा धरणात ३८२ दलघफुट नविन पाण्याची आवक झाली होती… कृष्णावंती धरण भरल्यामुळे निळवंडे धरणामध्ये नविन पाण्याची आवक सुरु झाली आहे.