Ahmednagar News : १९ सप्टेंबर २०२३ पासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. राहुरी येथील अनेक गणेश उत्सव मंडळांनी जिल्ह्या बाहेरील डिजे बुक केल्याचे समोर येत आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या आवाज मर्यादेचे पालन करण्यासाठी जिल्ह्या बाहेरून येणारे डिजे जप्त करुन कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १८ सप्टेंबर २०२३ पासून सर्वत्र गणेशोत्सव सुरु होत आहे. गणेशोत्सव व मिरवणूक दरम्यान कर्णकर्कश आवाजाचे डिजे वाजवले जातात. त्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध तसेच हृदयाचे आजार असणाऱ्या लोकांना याचा प्रचंड त्रास होत असतो.

काही ठिकाणी कर्णकर्कश आवाजाने बहिरेपणा आल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव व मिरवणूकीसाठी पुणे, कराड, सातारा, सांगली तसेच अन्य ठिकाणांहून येणारे कर्णकर्कश आवाजाचे डिजे नाकाबंदी करुन जप्त करण्यात येणार आहे.
तसेच त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे राहुरी येथील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले आहे. गणेशोत्सव व मिरवणूकी दरम्यान कोणत्याही गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या आवाजाचे डिजे बुक करु नये.
गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव आहे. या दरम्यान धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवावे. कोणालाही त्रास न होता. अगदी शांततेत गणेशोत्सव व मिरवणूक साजरी करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले.