Ahmednagar News : संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत १० दिवसात १ कोटी ३७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. कराची थकबाकी न भरणाऱ्या नागरिकांवर जप्तीची धडक कारवाई करण्यात आली आहे.
संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कराची वसुली मोहीम सुरू आहे. नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. उपमुख्याधिकारी संजय पेखळे,
कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी दत्तू साळवे, साजिद पटेल, प्रल्हाद देवरे, कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ, तसेच पंकज मुंगसे, विशाल कोल्हे, अमृत काजवे, प्रदीप मावलकर यांच्यासह नगर परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असलेले संयुक्त पथक कामगिरीसाठी नियुक्त करण्यात आले आहे.
विशेष वसुली मोहिमे अंतर्गत मालमत्ता व पाणीपट्टी कराची वसुली करण्यात येत असून या पथकाने आतापर्यंत शहरातील विविध भागातील मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांवर १९ व्यावसायिक गाळे असलेल्या मालमत्तांची जप्ती करण्यात आलेली असून १७ नळ कनेक्शन तोडण्यात आलेले आहे. याशिवाय एक बोअरवेल इलेक्ट्रिक मोटरसह जप्त करण्यात आली आहे. वसुली पथकाने केलेल्या धडक कारवाई पोटी गेल्या दहा दिवसात थकबाकीदारांकडून १ कोटी ३७ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे.
३१ मार्च अखेर जवळ येत असल्याने कराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांवर कारवाईचा वेग तीव्र स्वरूपात करण्यात येणार असून थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच अशा थकबाकीदारांची नावे दवंडीद्वारे शहरात पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांनी कराची रक्कम त्वरित नगरपालिकेत भरावी व नगरपरिषदेत सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.
मालमत्ता जप्ती दरम्यान केलेल्या कारवाईत वसुली विभागाचे राजेश वाडेकर, सुनील हामंद, वसंत मेहेर, संदीप सातपुते, आनंदा गाडे, राजेंद्र पांडे, संजय अभंग, संतोष पितळे, संजय अभंग, सयाजी काठे, अल्ताफ शेख, आकलाक शेख, सुदाम सातपुते, जालिंदर हिरे, विलास घोडेकर, सतीश बुरूंगुले, जितेंद्र थिटे, मच्छिद्र काठे, कुणाल चांगरे, रमेश ताजणे, मेहबूब पठाण, उदय पाटील, संजय अभंग आदी कर्मचाऱ्यांचा सहभागी होते.
दरम्यान, नगरपरिषदेने केलेल्या धडक कारवाईमुळे कर भरण्यासाठी नगरपरिषदेच्या वसुली विभागात मोठी गर्दी झालेली दिसत अ आहे. नागरिकांची कर भरण्यासाठी गैरसोय होऊ नाही म्हणून शासकीय सुट्टीच्या दिवशी सुद्धा नगरपरिषदेचा कर विभाग सुरू ठेवण्यात आलेला आहे.