लाल मिरची काळवंडली ; आवक वाढल्याने दरात झाली मोठी घट

Published on -

Ahilyanagar News: सध्या बाजारात लाल मिरचीचे दर कमी झाल्यामुळे यंदा मिरचीचा ठसका उतरला असून, गृहिणींची तिखट बनवण्याची लगबग वाढली आहे. लाल मिरची गेल्या महिन्यात महागली होती व मिरचीचे दर आणखी वाढण्याची शक्यता होती, पण मिरचीने ग्राहकांना विशेषत: गृहिणींना सुखद धक्का दिला आहे.

वर्षभराच्या तिखटासाठी आता अधिक पैसे खर्च करण्याची गरज नाही. लाल मिरचीचे भाव घसरल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांना फटका बसला असला तरी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मिरची स्वस्त झाल्याने सध्या मसाल्यातील गोडवा वाढला आहे. उन्हे तापायला सुरुवात झाली की, अनेक जण मसाला करण्याच्या तयारीला लागतात लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल एवढे तिखट करून ठेवले जाते.

गेल्या वर्षी सुक्या मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाल मिरचीचे भाव ३५० ते ४०० रुपये किलो होते. मात्र, यंदा किलोमागे हे दर १०० ते १५० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात लाल मिरचीचा ठसका उतरणीला लागला आहे. कुठल्याही खाद्यपदार्थाला तिखट तडका देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाल मिरचीचे भाव उतरल्याने ग्राहकांना अच्छे दिन आले आहेत.

उन्हाळा सुरू झाला की महिला मसाला तयार करायाच्या तयारीला लागतात. यंदा दिवाळीपासूनच बाजारात लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने बाजार घसरले असल्याचे बोलले जात आहे. लाल मिरचीचे दर कमी झाल्याने ग्राहकांची खरेदी वाढली आहे. उन्हाळ्यामुळे घरोघर मसाला बनविण्यास सुरुवात झाली आहे.

आठवडाभरात आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. परिणामी एरवीपेक्षा वीस ते तीस टक्के खरेदी वाढली आहे. एप्रिलमध्ये बहुतेक शाळांच्या परीक्षाही संपलेल्या असतात, त्यानंतर बहुतेक जण फिरण्यासाठी बाहेर जात असल्याने अनेकांचा कल त्याआधीच लाल मसाला तयार करून घेण्याकडे असतो,त्यामुळे फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये लाल मिरचीला ज़ास्त मागणी असते. त्यानुसार लाल मिरचीला मागणी वाढू लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe