Ahmednagar News : भंडारदरा, दारणा आणि मुळा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची लोणी येथे बैठक घेऊन भंडारदरा, निळवंडे, गोदावरी आणि मुळा धरणातील पाण्याची सद्यस्थिती जाणून घेतली.
याप्रसंगी जलसंपदा विभागाच्या नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता महेश आमले, कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, नगर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, निळवंडे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पावसाचे प्रमाण अजूनही अत्यल्प असल्याने अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. बहुतांशी भागातील पाण्याची मागणी वाढत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.