Ahilyanagar News : कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात वेळेवर आणि भरपूर पाणी मिळावे यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. पुण्यातील सिंचन भवन येथे आयोजित झालेल्या बैठकीत त्यांनी सिंचन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सीना व कुकडी कालव्यांच्या आवर्तनासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे.
या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या रविवार, २७ एप्रिलपासून सीना कालव्यातून पूर्ण दाबाने पाणी सोडले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक त्या वेळेत पाणी मिळून त्यांच्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान टळण्यास मदत होणार आहे. कुकडी कालव्याच्या आवर्तनाबाबतही लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने कर्जत-जामखेड परिसरात भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर खाली गेली आहे. परिणामी, चारा पिके, फळबागा आणि उन्हाळी पिके धोक्यात आली आहेत. तसेच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ नये म्हणून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
हेड टू टेल धोरणावर भर
मागील वेळेस कमी दाबाने पाणी सोडल्यामुळे अनेक शेवटच्या टोकावरच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले नव्हते. त्यामुळे यंदा “हेड टू टेल” धोरण राबवून सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी रोहित पवार यांनी ठाम भूमिका घेतली. आवर्तनाची मुदत ४० दिवस ठेवण्याचीही त्यांनी आग्रहाने मागणी केली.