Ahilyanagar News : नगर जिल्ह्यातील महामार्गालगतची अतिक्रमणे त्वरित हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नुकतेच दिले. त्यानंतर कोल्हार येथील महामार्गालगतच्या व्यावसायिकांना तीन दिवसांत अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. यामुळे व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून अनेकांनी आपल्या दुकानातील साहित्य हलवण्यास सुरुवात केली आहे.
सुमारे आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बांधकाम विभागाचे अधीक्षक भारतकुमार बाविस्कर, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणांविरोधात तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

उपविभागीय अधिकाऱ्यांना समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या निर्णयानंतर टपऱ्या, पत्र्याचे शेड, पक्की बांधकामे आणि हातगाड्या लावणाऱ्या व्यावसायिकांना तसेच शासकीय जागेतील अतिक्रमणधारकांना शनिवारी नोटिसा देण्यात आल्या आहेत.
शनिवारी सकाळी महामार्गाचे मोजमाप करून अधिकाऱ्यांनी थेट प्रत्यक्ष व बंद असलेल्या आस्थापनांवर मार्किंग केले आणि नोटिसा लावल्या. केवळ तीन दिवसांची मुदत दिल्याने व्यावसायिक चिंतेत पडले आहेत. काही व्यावसायिकांनी स्वत:हून दुकान रिकामे करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप सर्वच अतिक्रमण धारकांना नोटिसा मिळालेल्या नसून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अनेक नोटिसा आल्या पण अतिक्रमण मोहीम यशस्वी झाली नाही अशी धारणा काही व्यावसायिकांची आहे. मात्र, यावेळी कारवाई रोखता येणार नाही, असे संकेत मिळत आहेत. श्रीरामपूर, अहिल्यानगर, राहाता आदी ठिकाणी बांधकाम विभागाने बुलडोझर आणि जेसीबी लावून कारवाई केल्यामुळे अनेक व्यावसायिकांची पळता भुई थोडी झाली.त्यामुळे कोल्हारमधील व्यावसायिकांनी देखील यातून धडा घेण्याची गरज आहे.