Ahmednagar News : अहमदनगर ,मधील विचार भारती या सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव उत्कृष्ट आरास स्पर्धेत चौपाटी कारंजा मित्र मंडळ व शिवगर्जना प्रतिष्ठाण या दोन गणेश मंडळांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उद्योजक नरेंद्र फिरोदिया, प्रमुख वक्ते राज्याचे लोकसाहित्य समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे व प्रमुख पाहुणे जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे यांच्या उपस्थितीत उत्साहात झाला.

यावेळी आवाहनानुसार गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी पुढील गणेशोत्सव डि.जे. मुक्त साजरा करण्याचा संकल्प केला. शहरात संस्कृतीक परंपरा जपणाऱ्या १० ढोल पथकांचाही विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी कार्याध्यक्ष अॅड. अभय आगरकर, रा. स्व. संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजाभाऊ मुळे, गणेशोत्सव आरास स्पर्धेचे प्रमुख अनिल मोहिते, विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे, सहसचिव महेंद्र जाखेटे आदींसह मोठ्या संख्यने युवक, युवती उपस्थित होते.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले, नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात नव्याने आलेल्या डीजे संकृतीमुळे खूप बीभत्स स्वरूप आले आहे. हे चित्र बदलाने खूप आवश्यक आहे. युवकांनी ठरवले तर हे शक्य आहे.
आपल्या नगर शहराचे नाव लवकरच बदलण्यात येणार आहे. या बदला बरोबरच नगरमध्ये पुढील गणेशोत्सव डीजे मुक्त पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प सर्व युवकांनी करावा. यासाठी विचार भारतीने पुढकार घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र जाखेटे यांनी केले तर आभार प्रशांत मुथा यांनी मानले. निकालाचे वाचन डॉ. विक्रम डिडवाणी यांनी केले. यावेळी भाजपाचे सचिन पारखी, किशोर बोरा, नगरसेवक रविंद्र बारस्कर आदिसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रबोधनात्मक देखावा : प्रथम, चौपाटी कारंजा मित्र मंडळ. चंद्रयान मोहिम : प्रथम, शिवगर्जना प्रतिष्ठान ट्रस्ट, उत्तेजनार्थ नेहरु मार्केट व्यापारी सार्वजनिक गणेश मंडळ, दाळमंडई तरुण मंडळ, शिवाजी आखाडा तरुण मंडळ मंगलगेट सेवा प्रतिष्ठान, शिवमित्र प्रतिष्ठान आदि मंडळांना रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देण्यात आले.