Nilwande Dam : तळेगाव दिघे येथील शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात निळवंडे धरण प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांचा शेतीचा पाणीप्रश्न सोडवावा,
असे साकडे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना घातले असून याप्रश्नी ग्रामसभेचा ठराव व ग्रामपंचायतचे निवेदन देत तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे सरपंच मयुर दिघे यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांचे लक्ष वेधले आहे.
याबाबत महसूलमंत्री विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव दिघे परिसरात चालू वर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने भीषण पाणी टंचाई जाणवत आहे.
गावातील पाइार तलाव कोरडे पडलेले असून पावसाळ्यात गाव शिवारातील चारही पाझर तलावांमध्ये पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट झालेला आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
निळवंडे डोंगराजवळून गेलेल्या डाव्या कालव्यातून पोटचाऱ्या तयार करून अथवा जलवाहिनी टाकून निळवंडे डाव्या कालव्याद्वारे भोजापूर चारीत पाणी सोडल्यास तळेगाव परिसरातील वंचित क्षेत्राला पाणी देणे शक्य आहे.
तसे केल्यास वंचित क्षेत्र कायमस्वरूपी ओलिताखाली येवू शकेल. याप्रश्नी तळेगाव ग्रामसभेत ठराव करण्यात आला आहे. त्यावर सूचक म्हणून अमोल बाळासाहेब दिघे यांचे तर अनुमोदक अण्णासाहेब सोपान दिघे यांची नावे आहे.
सदर ठराव आणि ग्रामपंचायतच्या पत्राद्वारे वंचित शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडवा, अशी मागणी प्रभारी सरपंच मयूर दिघे यांनी केली आहे. निळवंडे धरणाच्या पाण्यापासून तळेगाव दिघे येथील ८० टक्के क्षेत्र वंचित राहिले आहे.
निळवंडे शिवारातील डोंगराजवळील डाव्या कालव्यातून चारी अथवा लोखंडी जलवाहिनीने पाणी तिगाव माथा येथील भोजापूर चारीत सोडून परिसरातील बंधारे भरून द्यावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी युवक कार्यकर्ते अमोल बाळासाहेब दिघे यांनी केली आहे.