‘सीना’च्या आवर्तनामुळे रब्बीच्या पिकांना जीवदान

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यामधील निमगाव गांगर्डा येथील सिना धरणामधून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दि.१७ नोव्हेंबर २०२३ रोजी शेती सिंचनासाठी धरणातीच्या उजव्या कालव्याद्वारे रब्बी पिकांकरिता सोडण्यात आलेले आवर्तन टेल टू हेड पोहचवून दि.१५ डिसेंबरपर्यंत तब्बल २७ दिवस सुरू राहिले.

यामुळे लाभक्षेत्रातील अंदाजे २ हजार हेक्टरहून अधिक रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे.पावसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा सिना धरणात ७० टक्के पाणीसाठा झाला होता. यामध्ये पावसाचे काही व कुकडीचे भोसा खिंडीद्वारे काही प्रमाणात पाणी आले होते.

यंदा पावसाने ओढ दिल्याने रब्बीच्या पिकांना पाण्याची आवश्यकता भासत होती. कमी अधिक पावसावर कशीबशी आलेली पिके वाया जातील, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमधून आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली.

त्या अनुषंगाने सिनातून उजव्या कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तनामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, ऊस, जनावरांचा चारा, आदी पिकांसह फळबागांना चांगला फायदा झाला.

त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील बऱ्यापैकी सुटला आहे. आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

रब्बीचे आवर्तन कुकडी विभाग क्र.२ चे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, सिना पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संदीपकुमार शेळके यांच्या नियोजनाखाली सुरळीतपणे पार पडले.

सिना धरणातून या आवर्तनाकरिता ३०० दलघफू पाणी देण्यात आले असून, धरण पाणलोट क्षेत्रात आजमितीला १३०० दलघफू पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

रब्बी हंगामातील आवर्तनाचे चांगले नियोजन करून उजव्या कालव्याद्वारे ‘टेल टूहेड ‘पाणी देण्यात आले. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला असून, धरणातील पाण्याचे यापुढेदेखील योग्य नियोजन केले जाईल.- संदीपकुमार शेळके, उपअभियंता, सीना पाटबंधारे विभाग

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe