Ahmednagar News : साईबाबा संस्थानच्या वतीने सोमवार २३ ते गुरुवार २६ ऑक्टोबर या कालावधीत श्री साईबाबांचा १०५ वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार असून
साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन २४ ऑक्टोबर २०२३ रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. साईभक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी केले आहे.
पत्रकात पी शिवाशंकर यांनी म्हटले, की श्री साईबाबांनी १०४ वर्षांपुर्वी दसऱ्याच्या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
त्यानंतर आजतागायत हा पुण्यतिथी उत्सव नव्या उत्साहात साजरा केला जात आहे. ज्यामुळे विजयादशमी म्हणजे श्री साईबाबांची पुण्यतिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. उत्सवानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.४५ वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ६ वाजता द्वारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, पहाटे ६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ७ वाजता श्रींची पाद्यपूजा, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती,
दुपारी ४ ते ६ या वेळेत कीर्तन होईल. सायंकाळी ६ वाजता धुपारती होईल. रात्री ७.३० ते ९ व रात्री ९.३० ते १० या वेळेत निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम, रात्री ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होईल. अंदाजे रात्री १० वाजता श्रींची शेजारती होईल. अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील.
दि. २४ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.१५ वाजता काकड आरती, पहाटे ५.४५ अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ६.२० श्रींचे मंगलस्नान, सकाळी ७ श्रींची पाद्यपूजा, सकाळी ९ भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १० कीर्तन तसेच सकाळी १०.३० वाजता समाधीसमोर आराधना विधी.
दुपारी १२.३० माध्यान्ह आरती तर सायंकाळी ५ खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन, सायंकाळी ६ वाजता धुपारती. रात्री ७.३० ते ९ व ९.३० ते १० निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम. रात्री ९.१५ वाजता गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक.
उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. सांगतेच्या दिवशी पहाटे सकाळच्या आरती व पूजा होऊन सकाळी १० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडी होईल.
उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्- यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.