Sharad Pawar : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक आहेत. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी आता आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू केले आहे.
या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटदेखील सक्रिय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील साईनगरी शिर्डीत शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रवादीत फूट पडण्यापूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे वळवण्याचे नियोजन शरद पवारांनी आखले आहे. विशेष म्हणजे या शिबिरादरम्यान शिर्डीत आलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी साईबाबांचे दर्शन देखील घेतले आहे.
मात्र साईबाबांच्या चरणी लीन होताच शरद पवारांवर आता खोचक टोला देखील लगावला जात आहे. पवारांना अनेकांनी त्यांच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी देखील शरद पवारांवर खोचक टीका केली आहे.
खरेतर शिर्डीचे शिबिर होण्यापूर्वी शरद पवारांनी एक विधान केले होते. यात पवारांनी पूजा-अर्चना ज्या ठिकाणी होते तिथे मी सहसा जात नाही. देव धर्म, पूजा-अर्चना यापासून मी जरा बाजूलाच असतो, असे सांगितले होते. तसेच त्यावेळी पवारांनी श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असून त्याला माझा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण देखील दिले होते.
मात्र जिथे पूजा अर्चना होते तिथे मी सहसा जात नाही असे त्यांनी विधान केले असल्याने शिबिरादरम्यान पवारांनी साईबाबांचे दर्शन घेतले असल्याने आनंद दवे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना आत्ता प्रत्येक मंदिरी अशा मोजक्या शब्दांत दवे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आयोध्या येथे तयार झालेल्या भव्य राम मंदिरासाठीच्या निमंत्रणावरून शरद पवारांनी एक महत्त्वाचे विधान केले होते. त्यांनी अयोध्या येथे भव्य राम मंदिर तयार झाले असून त्याचा आपल्याला आनंद आहे पण आपण मंदिरात जात नाहीत असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते.
मात्र आता शरद पवार यांनी सुप्रिया सुळेसोबत साईबाबांचे दर्शन घेतले आहे. यामुळे त्यांच्यावर हिंदू महासंघाने टीका केली आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना आत्ता प्रत्येक मंदिरी असं बोलून शरद पवारांना त्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे.













