सरकारच्या त्या एका निर्णयामुळॆ साईभक्तांना होतोय त्रास !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- निर्बंधांमध्ये शिथिलता आणत राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर शिर्डीचे साईमंदिरही भाविकांसाठी खुलं झालं आहे.

मात्र असं असलं तरी राज्य शासनाच्या एका निर्णयाने साईभक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाईन पासची सक्ती आणि १० वर्षांखालील बालकांना मंदिरात प्रवेश नसल्याने भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

शिर्डीच्या साईमंदिरात दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. करोना संकटामुळे अनेक महिने साईमंदिर बंद असल्याने भाविकांना समाधीचे दर्शन घेता आले नाही.

७ ऑक्टोबर रोजी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुलं झालं आहे. मात्र अनेक अटी-शर्ती असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एकाच कुटुंबातील काहींना दर्शन मिळत आहे तर काहींना दर्शन न घेता माघारी परतावे लागत आहे. राज्य सरकारने नुकतीच ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना दर्शनासाठी परवानगी दिली असून

त्याची अंमलबजावणी साईबाबा संस्थानने सुरू केली आहे. मात्र अद्याप १० वर्षांखालील बालकांना मंदिर प्रवेश मिळत नसल्याने पालकांना मुलांसह दर्शन रांगेबाहेरच थांबण्याची वेळ येत आहे. त्यामुळे १० वर्षांच्या आतील बालकांना साई मंदिरात प्रवेश मिळावा अशी मागणी भाविकांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe