शिर्डी: खरं सांगायचं तर माणुसकी अजूनही जिवंत आहे हे दाखवणारी एक घटना शिर्डीत घडली. जालना जिल्ह्यातल्या केंदली गावात राहणाऱ्या गजानन सव्वाराव म्हस्के यांच्याकडे पत्नीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसे नव्हते.
मोलमजुरी करून कसंबसं जीवन जगणारे गजानन, जे स्वतः अपंग आहेत, पत्नीला घेऊन शिर्डी संस्थानच्या दवाखान्यात आले. पण त्याच वेळी त्यांना साईदरबारी १४ हजार रुपयांचं नोटांचं बंडल सापडलं.

आता कोणाच्याही मनात लोभ येईल, पण गजानन यांनी ते बंडल तसंच संस्थानकडे जमा केलं. त्यांच्या या प्रामाणिकपणाची सगळीकडे चर्चा होतेय.
पत्नीला पोटाचा आजार झालाय, उपचार सुरू आहेत. अशा बिकट परिस्थितीतही गजानन साईबाबांचं दर्शन घ्यायला गेले. द्वारकामाई मंदिरातून बाहेर पडताना त्यांना हे पैसे सापडले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे दिले.
मग कर्मचाऱ्यांनी त्यांना सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्याकडे नेलं. तिथे माजी नगराध्यक्ष नीलेश कोते आणि श्रीरामनवमी यात्रा समितीचे अध्यक्ष दीपक वारुळेही हजर होते. गजानन यांची गरिबी आणि त्यांचा हा मोठेपणा पाहून सगळ्यांचं मन भरून आलं.
साईबाबांनी शिकवलेली माणुसकी आणि प्रामाणिकपणा गजानन यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. ‘गरिबी अव्वल बादशाही, अमीरीसे लाख सवाई’ हे साईबाबांचे शब्द त्यांनी खरे करून दाखवले.
नीलेश कोते आणि दीपक वारुळे यांनी गजानन यांचा सत्कार केला आणि त्यांच्या या प्रामाणिकपणाचं मनापासून कौतुक केलं.