अहिल्यानगर : देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानतर्फे भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. संस्थानच्या ऑनलाईन सेवा अधिक सुलभ करण्यासाठी स्वतंत्र आयटी विभाग कार्यान्वित असून, आता चॅटबॉट ही डिजिटल सेवा भक्तांसाठी सुरू करण्यात आली आहे.
गुरुवारी (२७ मार्च) साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीत या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, विश्वनाथ बजाज आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात चॅटबॉट प्रणालीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

भक्तांना विविध सेवा व सुविधा तत्काळ मिळाव्यात, यासाठी ही सुविधा कार्यान्वित करण्यात आल्याचे संस्थान प्रशासनाने सांगितले. मात्र, या नव्या प्रणालीबाबत काही साईभक्तांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. पूर्वीच्या वेब पोर्टलवरच सुविधा असताना चॅटबॉटची गरज का भासली? तसेच, चॅटबॉट आणि चॅटजीपीटीमध्ये नेमका काय फरक आहे? असे सवाल भक्तांमध्ये चर्चिले जात आहेत.
दरम्यान, या चॅटबॉटच्या विकासासाठी मोठा खर्च झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. काहींनी हा खर्च प्रचंड असल्याचे सूचित केले असले तरी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी यावर फारसा खर्च नसल्याचे स्पष्ट केले आहे. भविष्यात या चॅटबॉटमध्ये अधिक सेवा आणि सुधारणा करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.