Shirdi News : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या चरणी देशातील महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या वतीने नव्याने लॉन्च करण्यात
आलेली ३१ लाख रुपये किंमतीची ‘महिंद्रा एक्सयूव्ही ७००’ कार साईचरणी अर्पण करण्यात आली असून साईबाबा संस्थानच्या वाहन ताफ्यात महिंद्रा कंपनीची ही आठरावी गाडी भेटस्वरूपात प्राप्त झाली असल्याचे संस्थानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या साईबाबांच्या दानपेटीत देश-विदेशातून लाखो भक्त सोनं, चांदी, हिरे, रोख रक्कम याबरोबरच वस्तुस्वरुप कडधान्य, भाजीपाला आदींचे भरभरून दान देत असतात. त्याचप्रमाणे भारत देशातील उद्योगपती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक जगदिशचंद्र महिंद्रा आणि कैलासचंद्र महिंद्रा यांची साईबाबांप्रती अतुट श्रद्धा आहे.
त्यांनी आतापर्यंत साईबाबा संस्थानला विविध प्रकारची १७ वाहने भेट दिली आहेत. शनिवार दि. २२ जुलै रोजी देण्यात आलेली एक्स यूव्ही ७०० ही अठरावी गाडी आहे. ही गाडी ३१ लाख रुपये किंमतीची आहे. या वाहनाची साईबाबा संस्थानच्या वतीने प्रवेशद्वार क्रमांक चारसमोर मंदिरातील पुजाऱ्यांच्या हस्ते पुजा करण्यात आली व यावेळी साई संस्थानच्या अधिकाऱ्यांकडे गाडीची कागदपत्रे व चाव्या सुपुर्द करण्यात आल्या.
याप्रसंगी साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे, प्रभारी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांच्यासह महिंद्रा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महिंद्रा उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय नाकारा यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने साईमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
यापूर्वी साईबाबा संस्थानला देण्यात आलेल्या वाहनांमध्ये महिंद्रा वायझर १, स्कॉर्पिओ ३, बोलेरो ३. एक्स. यू. व्ही ५०० १, टी. यू. व्ही ३००१, मराझो १, थार १, महिंद्रा झायलो १, महिंद्रा मॅक्सिमो १, महिंद्रा ट्रॅक्टर २, मोटारसायकल २ अशा १७ आणि एक्सयूव्ही ७०० ही अठरावी गाडी साईंच्या चरणी अर्पण केली आहे. साईबाबा संस्थानच्या वाहन ताफ्यात सर्वाधिक महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या गाड्या आहेत.