Saklai Pani Yojana : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे चिंचणी येथील घोड धरणाच्या फेर जल नियोजनाला राज्याच्या जलसंपदा विभागाने 21 मार्च 2025 रोजी मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी लागणारं पाणी घोड धरणातून उपलब्ध होणार असून, या योजनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
हा शासन निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जारी झाला आहे. साकळाई योजनेची ही प्रदीर्घ प्रतीक्षा संपल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि ते या यशाचं श्रेय विखे पाटील यांच्यासह इतर नेत्यांना देत आहेत.

साकळाई योजनेचा प्रस्ताव मागील 30-40 वर्षांपासून रखडलेला होता. या योजनेला गती मिळावी म्हणून साकळाई कृती समितीने मोठा लढा उभारला. त्यांनी वेळोवेळी आंदोलनं, रास्ता रोको केले आणि शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार आलं आणि जलसंपदा खातं विखे पाटील यांच्याकडे गेलं.
कृती समितीने त्यांच्याकडे वारंवार मागणी लावून धरली. अलीकडेच समितीने विखे पाटील यांची भेट घेतली होती, तेव्हाही त्यांनी लवकरच प्रश्न सुटेल असं आश्वासन दिलं होतं. आता ही मंजुरी मिळाल्याने कृती समितीचा लढा आणि शेतकऱ्यांची मेहनत फळाला आली आहे.
साकळाई योजनेचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी वाळकी येथे झालेल्या सभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा केली होती.
पण त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झालं आणि ही योजना मागे पडली. युती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी या योजनेसाठी पाणी उपलब्ध असल्याचं दाखवून मंत्रालयात बैठका घेतल्या.
आता महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं आणि जलसंपदा खातं विखे पाटील यांच्याकडे आलं. मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारताच त्यांनी साकळाई योजना मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. आज तो शब्द पूर्ण झाल्याने शेतकरी त्यांचे तसेच सुजय विखे पाटील आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आभार मानत आहेत.