वाळू लिलाव पुणे जिल्ह्यात, वाळूउपसा नगर जिल्ह्यात !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील वडगाव शिंदोडी, या भागातून अवैध वाळूउपसा सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात असून, पुणे जिल्ह्यातील निमोणे व चिंचणी येथील घोड नदीपात्रातील गाळमिश्रित वाळूउपसा करण्यास पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असताना प्रत्यक्षात श्रीगोंदा तालुक्यातील वडगाव शिंदोडी येथून वाळूउपसा होत असल्याने हा वाळूउपसा न थांबवल्यास उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी घोडनदीपात्रातील माती मिश्रित वाळूउपसा व वाहतूक करण्याबाबत परवानगी दिली आहे. लिलावात उपसा करण्यासाठी १, २, ४७ १४८, १६४ हे गट चिंचणी गावालगत नागनाथ मंदिरालगत लिलावासाठी नमूद करण्यात आले आहे.

मात्र, या ठिकाणांहून वाळूउपसा करण्याऐवजी चिंचणी धरण फुगवटा क्षेत्रातील श्रीगोंदा हद्दीतून हा वाळूउपसा सुरू आहे. जवळपास वीस ते पंचवीस बोटींच्या सहाय्याने हा वाळूउपसा सुरू असून,

आतापर्यंत या भागातून पाच हजार ब्रास वाळूउपसा झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वडगाव शिंदोडी भागातील वाळूउपसा तातडीने बंद न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वाळूउपसा बंद करण्यात यावा

लिलाव झालेले गट आणि प्रत्यक्ष होणारा वाळूउपसा यामध्ये तीन किलोमीटरचे अंतर आहे. वाळूउपसा लिलाव शिरूर, पुणे हद्दीतील झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात वाळूउपसा हा श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीतून होत असून, वडगाव शिंदोडी हद्दीतील वाळूउपसा तातडीने बंद करण्यात यावा. : संतोष पवार, माजी सरपंच, वडगाव शिंदोडीचे

पाहणी करण्याच्या सूचना

श्रीगोंदा हद्दीत वाळूउपसा होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून पुढील कारवाई केली जाईल.: मिलिंद कुलथे, तहसीलदार, श्रीगोंदा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe