अहिल्यानगर : ज्यांनी भांडणात मध्यस्थी केली, त्यांच्यावरच थेट तलवारीचे वार झाल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर शहरातील घास गल्ली येथे ११ मार्च रोजी घडली. या प्रकरणी ५ जणांनी शिवीगाळ दमदाटी करीत दोघांना लाथाबुक्क्यानी, लाकडी दांडके, लोखंडी रॉड व तलवारीने मारहाण करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेवरुन भांडणे सोडवायला जावे की नाही, असाच प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत खान फैज अन्वर वाहिद अहमद (तांबटकर) (वय २४, रा. तांबटकर गल्ली (घास गल्ली) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घासगल्ली येथे मज्जिद समोर यासीन अरफाक शेख (रा. घास गल्ली, अहिल्यानगर) व आरफान इकबाल पवार (रा. नवी पेठ, शहाजीराजे रोड, अहिल्यानगर) यांच्यात शाब्दिक भांडण चालू होते. फैज खान हा भांडण मिटवण्यासाठी त्या ठिकाणी गेला असता आरफान पवार याने त्याला शिवीगाळ करून गचांडी पकडून ‘तू आमच्या मध्ये येऊ नकोस, येथून निघून जा’ असे म्हटल्याने फैज खान तेथून निघून गेला आणि त्यांच्या गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानात जाऊन बसला.

थोड्या वेळाने आरफान इकबाल पवार, माजीद इकबाल पवार, इस्माईल इकबाल पवार, यासीन निसार पवार व जिशान अन्वर तांबटकर (सर्व रा. शहाजीराजे रोड, घासगल्ली अ.नगर) हे तेथे आले आणि त्यांनी फैज आणि त्याचा भाऊ रैयान यांना शिवीगाळ केली. त्यांचे शाब्दिक वाद होत असताना तेथे सोफियान अकिब अहमद खान यांनी त्यांना समजावून सांगितले असता त्यांना देखील शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर अचानक ५ जणांनी फैज व रैयान यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
इस्माईल पवार याच्या हातातील तलवार आरफान पवार याच्या हातातील लोखंडी रॉड माजीदच्या हातातील लाकडी दांडके व इतरांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन ‘तुमको छोडेंगे नही, तुम्हारे खानदान को मिटा देंगे’ असे म्हणत इस्माईल याने फैज याच्या डोक्यावर वार करुन खुनाचा प्रयत्न केला. आरफान आणि माजीद यांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यावेळी तेथील नागरिक भांडण सोडवण्याकरता आले असता ५ जणांनी ‘हमारे नाद को लगे तो छोडेंगे नही’ असे म्हणून तिथून निघून गेले.याप्रकरणी फैज खान याने दिलेल्या फिर्यादीवरुन इस्माईल पवार, आरफान पवार, माजीद पवार, जिशान तांबटकर, यासीन पवार यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद केली.