अहिल्यानगर : तू खूप माजला आहेस, आमच्याकडे रागाने का पाहतोस, आम्हाला ओळखत नाहीस काय, असे म्हणून शिवीगाळ करून चौघांनी एकास लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण करुन लोखंडी कोयता, चॉपरने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना क्लेरा ब्रूस बॉईज होस्टेलच्या समोरील रोडवर १९ मार्च रोजी मध्यरात्री घडली.
याबाबत अलजैद रहीम शेख (वय २२,रा. नालसाब चौक, सुभेदार गल्ली, झेंडीगेट) याने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हा १८ मार्च रोजी दुपारी नालसाब चौक येथील पार्किंग जवळून जाताना त्याला अलिरजा सुभेदार दादू, रबनवाज सुभेदार सलाऊद्दीन, अरफान सुभेदार सलाऊद्दीन, आर्यन इमरान जहागीरदार (सर्व रा. झेंडीगेट, अ.नगर) हे भेटले.

त्यावेळी अलीराज म्हणाला की तू आमच्याकडे रागाने का पाहतोस पुन्हा रागाने पाहिले तर तुझे हात पाय तोडून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चौघांनी पुन्हा शिवीगाळ केली. अलीराज व रबनावाज यांनी हाताने फाईट मारल्या व पोटात छातीत दुखापत केली. या मारहाणीत दुखापत झाल्याने अलजैद हा भावासह औषध आणण्यासाठी बसस्थानक येथील मेडिकल येथे जात असताना त्या चौघांनी त्यास क्लेरा ब्रूस बॉईज होस्टेलच्या समोरील रोडवर अडवून तू खूप माजला आहेस, आमच्याकडे रागाने पाहतोस काय, तू आम्हाला ओळखत नाहीस असे शिवीगाळ केली.
त्यावेळी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना अलिरजा याने त्याच्या हाताची लोखंडी कोयता त्याच्या डोक्यात मारला व इतरांनी अब इसको जिंदा नही छोडेंगे असे म्हणत लोखंडी चॉपरने पाठीत मारले. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली. पुन्हा आमच्या नादी लागलास तर जिवंत सोडणार नाही. अशी धमकी देऊन तेथून निघून गेले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अलजैद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.