अवघ्या २५ मिनिटांत भंडारदरा धरण पोहून पार : शाळकरी मुलांची कमाल !

Published on -

५ फेब्रुवारी २०२५ भंडारदरा : अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक भंडारदरा धरण अवघ्या २५ मिनिटांत पोहून पार करण्याची किमया शाळकरी मुलांनी केली आहे. या अपूर्व कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.भंडारदरा धरण हे ब्रिटिशकालीन असून, उन्हाळ्यात येथे पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

शेंडी गावातील चार शाळकरी मुले सार्थक विनोद आरणे, आर्यन संजय मदने, मेघराज पप्पू पवार आणि निशांत हरीश भोईर यांनी अवघ्या २५ मिनिटांत हे धरण पोहून पार केले. ही सर्व मुले पाचवी ते आठवीच्या वर्गात शिकत असून, ते रोज सकाळी धरणात पोहण्याचा सराव करतात. गेल्या काही दिवसांपासून ही मुले
धरणाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी पोहत जात आहेत.

या मुलांना शेंडी गावचे माजी सरपंच दिलीप भांगरे आणि पांडू अवसरकर यांचे विशेष मार्गदर्शन मिळत आहे. आदिवासी भागातील बहुतांशी मुले पोहण्यात कुशल असतात. मागील वर्षीही काही लहान मुलांनी हे धरण अर्ध्या तासात पार केले होते; मात्र या चार मुलांनी तो विक्रम मोडीत काढला आहे.

या मुलांना योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते उत्तम जलतरणपटू होऊ शकतात आणि महाराष्ट्र तसेच भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात, असा विश्वास शेंडी गावचे माजी सरपंच दिलीप भांगरे यांनी व्यक्त केला आहे. या बाल जलतरणपटूंनी उभ्या केलेल्या या विक्रमी पराक्रमामुळे परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe