१ मार्च २०२५ अहिल्यानगर : कामावर असताना खूप त्रास देऊन, कामावरून काढून टाकल्याच्या रागातून विळद घाट येथील विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या सिक्युरिटी सुपरवायझरला चौघांनी रस्त्यात अडवून शिवीगाळ दमदाटी करीत दगडाने व चापटीने मारहाण केल्याची घटना एमआयडीसी परिसरातील दूध डेअरी चौक येथे २५ फेब्रुवारी रोजी रात्री १० च्या सुमारास घडली घडली.
याबाबत सिक्युरिटी सुपरवायझर पांडुरंग भानुदास भगत (वय ५०, रा. मठाची वाडी शेवगाव, हल्ली रा. शेंडी बायपास रोड, दूध डेअरी चौक) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भगत हे विखे पाटील मेडिकल कॉलेज येथे सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून कामास आहेत.तेथेच भारत गायकवाड आणि काजल भारत गायकवाड हे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते.

२५ फेब्रुवारी रोजी रात्री १० च्या सुमारास एमआयडीसी परिसरातील दूध डेअरी चौकातील वैष्णवी इलेक्ट्रिकल दुकानासमोरून भगत हे चाललेले असताना तेथे भारत गायकवाड व काजल भारत गायकवाड (दोघे रा. दत्त मंदिराजवळ, डोंगरे वस्ती) हे त्यांच्या सोबत दोन अनोळखी साथीदारांसह आले.त्यांनी भगत यांना तुम्ही आम्हाला खूप त्रास देत, वेगवेगळ्या ड्युटी लावून कामावरून काढून टाकले.
असे म्हटले असता, भगत यांनी तुम्हाला कामावरून काढले याच्याशी माझा काहीही संबंध नाही असे समजून सांगत असताना भारत गायकवाड यांनी भगत यांना दगडाने त्यांच्या छातीवर, पोटावर, हातावर, मारहाण केली. त्यावेळी काजल गायकवाड यांनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली.
तर दोन अनोळखी इसमांनी दगडाने मारहाण केली. या मारहाणीत भगत जखमी झाले.याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारत गायकवाड, काजल गायकवाड यांच्यासह २ अनोळखी इसमांच्या विरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.