शनीअमावस्येची पर्वणी साधत सात लाख भाविकांनी घेतले शनीदर्शन; दहा तोळे सोने अर्पण

Published on -

अहिल्यानगर : जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनीअमावस्यामुळे सात लाख भाविकांनी शनि मूर्तीचे दर्शन घेतले. देवस्थाने शनी अमावस्या असल्याने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चौथऱ्यावरील दर्शन बंद केले होते. भाविकांना उन्हाच्या बचावासाठी मंडप उभारले होते तीन ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता सुरू झालेली दर्श अमावस्या शनिवारी सायंकाळपर्यंत असल्याने शुक्रवारी सायंकाळ पासुनच भाविकांनी शनीदर्शन घेण्यास सुरूवात झाली, शनिवारी सकाळपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. देवस्थाने राहुरी, घोडेगाव, संभाजीनगर मार्गावरून येणाऱ्या भाविकांसाठी शिंगणापूर पासून अर्धा किलोमीटर अंतरावर खाजगी जागेत वाहनतळ तयार केले होते परंतु शनिवारी दुपारपर्यंतच वाहनतळ हाउसफुल झाल्याने वाहने रस्त्यावरच उभी करण्यात आली,परिणामी तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.

देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी मंडपाची सावली, आरोग्य, पिण्याचे पाणी, मॅट रुग्णवाहिका, हरवले -सापडले, आरोग्य सुविधा आदी पुरविण्यात आल्या होत्या. पु. ना. गाडगीळचे संचालक सौरभ गाडगीळ यांनी १० तोळे सोने दान केले.शनिवारी दिवसभर दिल्ली, मुंबई व हरियाणा येथील भाविकांसह अनेक शनिभक्तांनी अन्नदान केले.शनि मूर्तीची झीज व धोका लक्षात घेऊन देवस्थानने १ मार्च पासुन शनीमूर्तीवर नोंदणीकृत तेल अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. देवस्थानचे सुरक्षारक्षक तेल तपासूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देत आहेत.

‘या’ राजकारण्यांनी घेतले दर्शन

खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार संग्राम जगताप, आमदार श्वेता महाले, आमदार हिकमत उधाण,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, पद्मश्री पोपटराव पवार यांनी शनीअभिषेक करून शनीदर्शन घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe