Ahilyanagar News: केडगाव : अहिल्यानगर तालुक्यात कडक उन्हाचे चटके आणि पाण्यासाठी वणवण भटकंती यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. माळराने ओसाड पडली, तलाव कोरडे झाले, तर विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठला आहे. या विदारक चित्रामुळे तालुक्यातील ११ गावे आणि ३३ वाड्या-वस्त्यांची तहान भागवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासन सतर्क असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.
यंदा पावसाळ्यात तालुक्यात कमी-अधिक पाऊस झाला. तालुक्याच्या पूर्व भागातील जेऊर परिसरात पाऊस कमी झाल्याने येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरलेच नाहीत. मात्र, दक्षिण भागातील वाळकी, अकोळनेर, सारोळा कासार आणि पश्चिमेकडील चास परिसरात पावसाचे प्रमाण चांगले होते, त्यामुळे तिथले तलाव भरले. चिचोंडी पाटील परिसरातील केल तलावही पूर्ण भरला होता.

11 गावे आणि ३३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
जेऊर परिसरात कमी पावसामुळे फेब्रुवारीपासूनच पाणी टंचाई तीव्र झाली. वाकी तलाव, पिंपळगाव माळवी तलाव, डोणी तलाव, शेटे वस्ती तलाव, इमामपूर पालखी तलाव यांसारखे तलाव पूर्ण भरले नाहीत. त्यामुळे या भागात तालुक्यात सर्वप्रथम टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागला. सध्या ११ गावे आणि ३३ वाड्या-वस्त्यांवरील १५ हजार ७४० नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागत आहे.
फेब्रुवारीपासूनच बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. जेऊर परिसरातील कांदा उत्पादन आणि रब्बी हंगामातील पिकांवरही याचा परिणाम झाला. बुन्हाणनगर आणि घोसपुरी पाणी योजनांवर तालुक्याची तहान भागवणे कठीण झाले आहे.
पाण्याअभावी वन्यप्राण्यांची भटकंती
तालुक्यात शाश्वत पाण्याचा स्रोत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. डोंगराळ भागात वसलेल्या गावांमध्ये पावसाळ्यात भूजल पातळी लवकर वाढते, पण उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. या गावांना दरवर्षी टँकरने पाणी पुरवावे लागते. गर्भगिरीच्या डोंगररांगांवरील गवत पूर्ण वाळले आहे, माळराने ओसाड झाली आहेत. डोंगरातील पाणवठे आटल्याने वन्यप्राण्यांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.
टँकरसाठी प्रस्ताव
सध्या इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, सांडवे, दशमी गव्हाण, बाळेवाडी, मदडगाव, कोल्हेवाडी, खांडके, सारोळा बद्दी, अकोळनेर यासह ३३ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवले जात आहे. काही गावांमधून नव्याने टँकरसाठी प्रस्ताव येत आहेत. जेऊर गावातील वाड्या-वस्त्यांनाही पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यासाठी नुकताच पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली.
प्रशासनाने नियोजन करणे गरजेचे
प्रशासनाने या संकटावर तत्परतेने कारवाई सुरू केली आहे. टँकरसाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव येताच गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, तहसीलदार संजय शिंदे आणि प्रांताधिकारी परिस्थितीची पाहणी करून तातडीने टँकर सुरू करत आहेत. प्रशासनाच्या या सतर्कतेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, त्यांचे कौतुक होत आहे.