श्रीगोदा शहराचे ग्रामदैवत संत श्री शेख महंमद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी सुरु झालेले धरणे आंदोलनाचा अकराव्या दिवशी ही प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. असल्याने त्याचा निषेध म्हणून सोमवार दि.२८ एप्रिल पासून गावकऱ्यांच्यावतीने आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती जेष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी दिली.
संत श्री शेख महंमद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार होण्यासाठी हभप बंडातात्या कराडकर, माणिक महाराज मोरे, जब्बार महाराज यांच्या नेतृत्वाखाली दि.१७ एप्रिल पासून वारकरी, गावकरी यांच्यासह लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय नेते मंडळीच्या उपस्थितीत भव्य मोर्चा, गाव बंद आंदोलन त्यावेळेस पासून धरणे आंदोलन तहसील कार्यालयांसमोर सुरू आहे.

भजन, कीर्तन, प्रवचन, महाआरती असे कार्यक्रम सुरू असले तरी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी पासून अजूनही प्रशासनाने आंदोलकांच निवेदन देखील घेतले नाही. प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या महाआरतीच्या निमित्ताने शांतता प्रस्थापित करण्याच्या घेतलेल्या शांतता कमेटी बैठकीत जेष्ठ नेते घनश्याम अण्णा शेलार व बाबासाहेब भोस यांनी प्रशासनाने या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे सांगितले होते. यानंतर ही आजपर्यंत प्रशासनाच्या वागण्यात बदल झाला नाही.
या सर्व प्रकारामुळे आंदोलकाच्या भावना संतप्त झालेल्या असून वारकरी संप्रदायांच्या पध्दतीने शांततामय मार्गाने सुरू असलेले आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने आंदोलकानी आत्मक्लेश आंदोलनाची सुरुवात म्हणून सोमवार दि.२८ एप्रिल पासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे जेष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.