साई भक्तांसाठी शिर्डी विमानतळाचा होणार विस्तार! ५०० कोटी रूपये खर्च करून दोन वर्षात काम पूर्ण होणार!

Published on -

शिर्डी – शिर्डी विमानतळाचा विस्तार ५०० कोटी रुपये खर्चून होणार आहे. हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्यात येणार असून, येथे चार ते पाच एरो ब्रिजची सोय असेल. २०२७ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा ठाम विश्वास माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय.

गुढीपाडव्याच्या दिवशी शिर्डीत पहिलं नाईट लँडिंग झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अहिल्यानगर हा जिल्हा उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा मध्यवर्ती भाग बनलाय.

वाहतुकीच्या दृष्टीनं हा जिल्हा महत्त्वाचं केंद्र आहे. उद्योगवाढीमुळे जिल्हा प्रगती करतोय, त्यामुळे विमानसेवेचा विस्तार खूप महत्त्वाचा आहे.

पुढच्या काळात कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना याचा मोठा फायदा होईल. आध्यात्मिक पर्यटनासाठी शिर्डी विमानतळ देशातलं एक प्रमुख विमानतळ बनेल. याबाबत पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. दोन वर्षांत हे विमानतळ पूर्ण करू, असं विखे पाटील म्हणाले.

शिर्डी विमानतळ सुरू झाल्यापासून प्रवाशांचं आवडतं ठिकाण बनलंय. सध्या दिवसा ८ विमानांचं लँडिंग आणि उड्डाण इथून होतं. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नाईट लँडिंगसाठी सगळी तयारी करून केंद्राकडून परवानगी मिळवली होती. रात्रीच्या विमानसेवेची तिकिटं दिवसापेक्षा स्वस्त असल्याने लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असं वाटतंय.

केंद्राच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये नाईट लँडिंगला मंजुरी दिली. त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये दिल्लीहून आलेल्या इंडिगो विमानाची रात्रीची चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे विमानतळाच्या विस्ताराचा आणि परिसराच्या विकासाचा नवा मार्ग खुला झाला. दोन वर्षांनंतर आता ही सेवा सुरू झालीय.

नाईट लँडिंगमुळे काकड आरतीला येणाऱ्या भाविकांना रात्री प्रवास करणं शक्य होईल. यामुळे भाविकांना मोठी सोय होणार आहे. रात्रीच्या विमानसेवेमुळे या भागाचा विकासही वेगाने होईल.

शिर्डीत भाविकांची संख्याही यामुळे खूप वाढेल, अशी आशा आहे. हैदराबादपासून रात्रीच्या सेवेला सुरुवात झाली असली, तरी भविष्यात इतर ठिकाणांसाठीही ही सेवा सुरू होईल, असं वाटतंय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe