११ मार्च २०२५ अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर केलेल्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शिर्डी विमानतळाच्या विस्तार आणि विकासासाठी एक हजार ३६७ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे.
शिवाय लवकरच नाईट लँडिंग व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पात विमानतळाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आल्याने शिर्डी व परिसरातील धार्मिक पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.

सन २०२१ मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा मिळाला होता. आता विमानतळाच्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा करत लवकरच नाईट लैंडिंग सुविधाही सुरू केली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शिर्डी हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने या विमानतळाच्या विकासामुळे भाविक आणि पर्यटकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
विस्तारित सुविधांमुळे देशभरातील प्रवाशांसाठी हे विमानतळ अधिक कार्यक्षम आणि सुटसुटीत होईल,अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारक आणि ज्ञानेश्वर सृष्टी आराखड्यास निधी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नगर-पुणे महामार्गावरील चास येथे राष्ट्रीय स्मारक उभारणीसाठी जिल्हा प्रशासनाने ५८८ कोटींचा आराखडा राज्य सरकारला सादर केला होता.
नेवासा येथे ८०० कोटींचा ज्ञानेश्वर सृष्टी आराखडा राज्य सरकारला सादर करण्यात आला होता.या प्रकल्पामध्ये संत ज्ञानेश्वरांचा सर्व जीवनपट, लेसर शो, आर्दीचा समावेश आहे.८०० कोटींमध्ये ज्ञानेश्वर सृष्टीसाठी ४०० कोटी, तर प्रवरा घाटसाठी ४०० कोटी खर्चाचा समावेश करण्यात आला आहे.
६६ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या सृष्टीत स्त्री सक्षमीकरण केंद्र, ‘एआय’ संग्राहालय तसेच महेश्वर (मध्य प्रदेश) येथील पुतळ्याप्रमाणे २० फूट उंच अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारला जाणार आहे.यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.