पत्नीच निधन, भावाने फसवणूक केली, मुलगा दुबईत नोकरीला ! इस्रोमध्ये काम केलेला शिर्डीत भिकारी कसा झाला ?

शिर्डीत साईभक्तांना त्रास देणाऱ्या ५० भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. एका भिक्षेकऱ्याने ‘इस्रो’मध्ये काम केल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली.

Published on -

Shirdi News : शिर्डी – साईबाबा मंदिरात येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून शिर्डी नगरपरिषद, साई संस्थान आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत ५० भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी करण्यात आली. या कारवाईत पकडण्यात आलेले हे भिकारी महाराष्ट्रासह चार राज्ये आणि १२ जिल्ह्यांतील असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही २० फेब्रुवारी रोजी अशीच मोहीम राबवून ७२ भिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

भिकाऱ्यांविरोधात शिर्डी पोलिसांची मोहीम

शिर्डी शहरात मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना त्रास देणाऱ्या भिकाऱ्यांविरोधात शिर्डी पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी मोहीम राबवली आहे. या मोहिमेत पोलिसांनी जवळपास ५० भिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, पोलिसांनी कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या एका व्यक्तीने धक्कादायक दावा केला आहे. या व्यक्तीने पोलिसांसमोर आपली ओळख ‘इस्रो’मध्ये काम करणारा माजी कर्मचारी अशी दिली. त्याने आपली ही अवस्था परिस्थितीमुळे ओढवली असल्याचे सांगितले.

मात्र, पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे आपली ओळख पटवणारी किंवा इस्रोत काम केल्याचा कोणताही अधिकृत पुरावा अथवा कागदपत्रे सापडली नाहीत. त्यामुळे त्याच्या दाव्याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. तथापि, शासकीय यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीच्या दाव्यात काही अंशी तथ्य असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या व्यक्तीने इस्रोमध्ये काम केले असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला भिक्षेकरी गृहात न पाठवता समज देऊन सोडून दिले आहे. पुढील काळात असे वर्तन टाळण्याच्या सूचना त्याला देण्यात आल्या.

या कारवाईबाबत शिर्डीचे पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी माहिती देताना सांगितले की, “शिर्डी शहरात भिकाऱ्यांमुळे भक्त त्रस्त होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही कारवाई केली. या मोहिमेत पकडलेल्या एका व्यक्तीने इस्रोत काम केल्याचा दावा केला. मात्र त्याच्याकडे कोणताही पुरावा नसल्याने त्याला समज देऊन मुक्त करण्यात आले आहे.दरम्यान, संबंधित व्यक्ती इस्रोमध्ये खरोखर कार्यरत होता की बनावट दावा करत होता, याबाबतचा तपशील अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत पुढील चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

मी इस्रोमध्ये काम करत होतो…

कारवाईदरम्यान एक भिक्षेकरी खडखडीत इंग्रजीत बोलताना आढळून आला. त्याने आपले नाव ‘नारायणन’ असल्याचे सांगत ‘मी इस्रोमध्ये काम करत होतो’ असा दावा केल्याने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. त्याने २००८ मध्ये मानमुदतपूर्व निवृत्ती घेतल्याचेही सांगितले. चौकशीत त्याने पत्नी निधन पावल्याची, भावाने फसवणूक केल्याची व मुलगा दुबईत नोकरी करत असल्याची माहिती दिली. त्यानुसार तो देशभरातील तीर्थक्षेत्रांना भेट देतो आणि यावेळी साई दर्शनासाठी शिर्डीत आला होता. तो २८ मार्च रोजी शिर्डीत साई दर्शनासाठी येणार होता पण त्याच्या आधीच नाशिकमध्ये त्याची बॅग चोरीला गेली.सदर बॅगमध्ये २० हजार रुपये व ओळखपत्र होते, असे त्याने पोलिसांसोबत बोलताना सांगितले.

पोलिसांनी दिली समज

नारायणनने नाशिकमध्ये त्याची बॅग चोरीला गेली असल्याचेही सांगितले, ज्यात ओळखपत्र व २० हजार रुपये होते, असे त्याने सांगितले. मात्र, पोलिसांना त्याच्याकडे इस्रोत काम केल्याचे कोणतेही दस्तऐवज सापडले नाहीत. त्यामुळे त्याला भिक्षेकरी गृहात न पाठवता, ‘पुन्हा असे कृत्य करू नको’ अशी समज देऊन मुक्त करण्यात आले. सदर व्यक्तीचा दावा खरा होता की फसवणूक करण्याचा प्रयत्न होता, यावर चर्चांना उधाण आले आहे.

साईभक्तांच्या सुविधेसाठी प्रशासनाचे पाऊल

या कारवाईचा मुख्य उद्देश म्हणजे शिर्डी येथे येणाऱ्या हजारो साईभक्तांना होणारा त्रास टाळणे हा होता. या भिकाऱ्यांमुळे मंदिर परिसरात अस्वच्छता, गोंधळ आणि गैरसोय निर्माण होत होती. कोर्टाच्या आदेशानुसार यावेळी पकडलेल्या भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर येथील निवारा गृहात करण्यात आली. पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी सांगितले की, भिक्षेकऱ्यांबाबत कोणतीही चुकीची वागणूक न ठेवता, कायद्याच्या चौकटीत राहून ही कारवाई करण्यात आली.

भिक्षेकऱ्यांविरोधातील मोहिमेला गती

शिर्डीतील प्रशासनाने धार्मिक स्थळी वाढती भिक्षावृत्ती लक्षात घेता सातत्याने अशा मोहिमा राबवण्याचा निर्धार केला आहे. याअंतर्गत नियमित कारवाई, तपासणी आणि निवारागृहात पुनर्वसन यावर भर दिला जात आहे. साईभक्तांना शिस्तबद्ध व शांत दर्शन अनुभवता यावे, यासाठी ही यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे दिसते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe