Shirdi Murder Case : कौटुंबिक वादातून जावयाने सासूरवाडीच्या सहा जणांना चाकूने भोसकल्याची घटना राहाता तालुक्यातील शिर्डी परिसरातील सावळीविहिर येथे गुरूवारी (दि. २१) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास घडली.
यात पत्नीसह मेव्हणा, आजीसासू तिघांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोराची सासू, सासरे आणि मेव्हणी असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला
कौटुंबिक वादातून जावयाने सासूरवाडीच्या दिसेल त्या सदस्यावर चाकूने वार केला. तिहेरी हत्याकांड घडविल्यावर आरोपी जावई व त्याचा भाऊ नाशिकच्या दिशेने पळून चालले होते. हत्याकांडानंतर अवघ्या पाच तासात या दोघांना ताब्यात घेवून शिर्डी पोलिसांनी जेरबंद केले. या तिहेरी हत्याकांडाने अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे. घटनेतील जखमींवर साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिसात तक्रार दिल्याचा राग
आरोपी सुरेश निकम याचा वर्षा हिच्याबरोबर नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर पती सुरेश दारू पिऊन पत्नी वर्षा सि सतत शिवीगाळ, मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून मयत वर्षा हि आपल्या दोन मुलींबरोबर माहेरी येऊन राहत होती.
नवऱ्याच्या त्रासासंदर्भात वर्षाने मागील महिन्यात संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर आरोपी सुरेश याने सासुरवाडीला येऊन पत्नी आणि सासू यांना शिवीगाळ केली असल्याने त्याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याचा मनात राग धरून आरोपीने आपल्या सासुरवाडीच्या तिघांचा जीव घेतला.
तिघांवर धारदार चाकूने वार करत हत्या
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, गुरूवारी (दि. २१) रात्री बारा वाजेच्या सुमारास आरोपी जावई सुरेश उर्फ बाळू विलास निकम व त्याचा चुलतभाऊ रोशन कैलास निकम (दोघे रा. संगमनेर) हे सुरेशची सासुरवाडी सावळीविहीर येथे आले होते.
त्यांनी घराचा दरवाजा वाजवला व आतून दरवाजा उघडताच आरोपीने पत्नी वर्षा सुरेश निकम (वय २७) मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड (वय २३), आजीसासू हिराबाई धृपद गायकवाड (वय ७०, सर्व रा. विलासनगर, सावळीविहीर, ताराहाता, जि. अहमदनगर) या तिघांवर धारदार चाकूने वार करत त्यांची हत्या केली.
तिघांची प्रकृती स्थिर
दरम्यान सासू संगीता चांगदेव गायकवाड (वय ४७), सासरे चांगदेव धृपद गायकवाड (वय ५४) आणि मेव्हणी योगिता महेंद्र जाधव (वय ३०, रा. सावळीविहीर) या तिघांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हत्याकांडानंतर दोन्हीही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमींचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या रहिवाशांनी गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले.
वर्षां गायकवाड, रोहित गायकवाड आणि हिराबाई गायकवाड हे तिघेही उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर संगीता चांगदेव गायकवाड, चांगदेव धृपद गायकवाड आणि योगिता महेंद्र जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
आरोपी पाच तासात जेरबंद
शिर्डी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर तसेच शिर्डी पोलीस स्टेशन असे चार पथके तातडीने रवाना करण्यात आली.
आरोपींची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पो.ना विशाल दळवी, संदीप चव्हाण, रविंद्र कर्डीले, प्रशांत राठोड, पो. कॉ. जालींदर माने, चालक संभाजी कोतकर,
शिर्डी पोलिस ठाण्याचे पोहेकॉ थोरमीसे, पो.ना. दिनेश कांबळे आदींनी नाशिक येथे जाऊन नाशिकरोड पोलीस स्टेशनचे सपोनि गणेश शेळके, पोसई रामदास विंचू, पोना. घेगडमल, पोना. पवार, पोकॉ जाधव, कासार, चत्तर, लोणारे यांची मदत घेऊन हत्याकांडातील आरोपी सुरेश निकम व रोशन निकम यांचा पाठलाग करत त्यांना शिताफीने जेरबंद केले.
याप्रकरणी योगिता जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश निकम व रोशन निकम यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०२, ३०७, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.