Ahilyanagar News : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. प्रशासन निवडणुकांसाठी सुसज्ज झाले आहे. यावेळी नवीन मतदारांची संख्या व महिला मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. शिर्डी व नगर दक्षिण लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे.
शिर्डी मतदार संघातील नेवासे मतदार संघात जवळपास २२ हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. यंदा पुरुषांपेक्षा स्त्री मतदारांची संख्या जास्त प्रमाणात वाढली असून सुमारे ४ हजार तरुण मतदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शिर्डीच्या खासदार निवडीत नवं मतदारांचे मतदान निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
किती वाढले मतदार ?
नेवासा तालुका विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ७३ हजार ४४१ मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २०१९ मध्ये हीच मतदारांची संख्या २ लाख ५३ हजार १२९ होती. त्यात यंदा २० हजार ३१२ मतदारांची वाढ झाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नेवासे तालुक्यात ५७ टक्के मतदान झाले होते, तर २०१९ ला ६९ टक्के मतदान झाले होते.
नेवासे विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ७३ हजार ४४१ मतदार असून, त्यात दिव्यांग मतदार १८६८ आहेत. ८५ वर्षांहून अधिक वयाचे ४,३३२ मतदार आहेत. मृत, दुबार, स्थलांतरित मतदारांची संख्या ७,८५८ एवढी आहे.
स्त्री मतदारांची संख्या १ लाख ३० हजार ८५१, तर पुरुष मतदारांची संख्या १ लाख ४२ हजार ५८५ आहे. तृतीय पंथी मतदारांची संख्या ५ इतकी आहे. विशेष म्हणजे १८ ते १९ वर्षे वयाचे नवमतदार ४,२२९ इतके आहेत.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शासन व सेवाभावी संस्था प्रयत्नशील आहेत. विविध उपक्रम सध्या राबवले जात असून आणखी काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नवमतदारांसाठी सेल्फी पॉईंट,
मतदानाच्या ठिकाणी पाळणा घर, दिव्यांग, वृद्धांना घरबसल्या मतदानाची सोय आदींसारख्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत.