शासनाने कांदा निर्यातबंदी व इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्यानंतर राज्यातील शेतकरी आक्रमक झाला. तसेच दुधाचे भाव देखील कोसळले. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.
हाच धागा पकडत अहमदनगर जिल्ह्यातील महसूलमंत्री विखे पाटील यांच्या मतदार संघात कोल्हार येथे ठाकरे गट आक्रमक झाला. महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी ठाकरे गटाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सरकारवर चौफेर टीका करत घेरले.
काय म्हणाले माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे
यावेळी माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, कांद्याचे, दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी कोलमडला आहे. कांद्याला देखील भाव कमी झाल्याने मातीमोल किंमत मिळत आहे. शेतकऱ्यांच्या या व्यथा आम्ही मांडलेल्या असून आता सरकारने यावर तोडगा काढावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसे न झल्यास शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराच त्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक
कांदा निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावर बंदी, दुधाचे दरवाढ आदींबाबत अहमदनगर मधील शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. आज (१५ डिसेंबर) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात आंदोलन छेडले.
विविध मागण्यांसाठी रास्ता रोको केला. यावेळी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिक एकवटला होता. त्यांनी कोल्हार गावातील नगर- मनमाड महाार्गावर रास्ता रोको केला.