२३ फेब्रुवारीला मी शिवबंधन बांधत शिवसेनेत शरीराने प्रवेश केला. मात्र मी सुरुवातीपासूनच मनान शिवसैनिक आहे. काँग्रेसमध्ये असताना मी माझ्या कार्यालयाच्या फलकावर शिवसेना दिवंगत नेते अनिलभैय्या राठोड यांचा फोटो लावला म्हणून काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला.
जुन्या महानगरपालिकेच्या वास्तूला मी जननायक स्व. अनिलभैय्या राठोड भवन असं नाव देण्याची मागणी करत राठोड यांचा मनपाच्या भिंतीवर फोटो चिटकवला. तर माझ्यावर विद्रूपीकरणाचा गुन्हा दाखल केला गेला. पण माझा मूळ डीएनए हा शिवसेनेचाच आहे. आगामी निवडणुकीत मनपावर शिवसेनेचा भगवा आम्ही फडकवू, असा निर्धार शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईत शिवसैनिकांचं एक दिवसीय निर्धार शिबिर पार पडलं. या शिबिरामध्ये पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते तथा खा संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये ‘मी शिवसेनेत का आलो’ या विषयावर काळे यांची मुलाखत पार पडली. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुंबईतील या शिबिराच्या माध्यमातून शिवसेनेने काळे यांना राज्य पातळीवर प्रोजेक्ट केल्याची चर्चा सुरू आहे. राज्य पातळीवर चमकण्याचा बहुमान या निमित्ताने काळे यांना मिळाला आहे.
यावेळी माजी मंत्री अनंत गीते, सुभाष देसाई, दिवाकर रावते, अनिल देसाई, राजन विचारे, आ. सुनील राऊत, कायदेतज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे आदींसह शिवसेनेचे राज्यातील अनेक नेते उपस्थित होते.
एका प्रश्न उत्तर देताना काळे म्हणाले की, राज्यात ज्या पद्धतीने काही लोक हिंदुत्व शिकवत आहेत त्यांच्या मधला खोटारडेपणा अनेक वेळा समोर आला आहे. देशातल जे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेतं तेच औरंगजेबाच्या कबरीसाठी सरकारचा निधी खर्च करत काय काय करतय हे महाराष्ट्राच्या समोर आहे. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्व कुणी शिकवू नये. खरं हिंदुत्व हे आजही मातोश्री वरच आहे. ते कुणीही चोरून नेऊ शकत नाही.