गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित, बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद रस्ते, शेत, शिवार रस्ते आदी लोकसहभागातून मोकळे करून घेण्याबात विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या आहेत. शिवपाणंद शेतरस्त्यांच्या मोजणीसाठी भूमिअभिलेखने फी आकारू नये अशाही सूचना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांनी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवपाणंद शेत रस्ते खुले करण्यासह रस्त्यांसंदर्भातील विविध मागण्यांसाठी पेरू आंदोलन केले होते. याची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील तालुकास्तरावर अतिक्रमित असलेले गाडीरस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे मार्ग व शिवरस्ते खुले करण्याची गरज आहे.

यासाठी विशेष मोहीम राबवणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार व अधीक्षक भूमिअभिलेख यांकडे प्रलंबित रस्ता मागणी, व इतर मागणी बाबत बैठक घेणे, तहसीलदार यांनी सादर केलेल्या प्रलंबित रस्त्याबाबत संख्या निश्चित करणे, तहसीलदार यांनी रस्त्यांबाबत सादर केलेला माहितीच्या अनुषंगाने मंडळ अधिकारी व तलाठी यांचे मार्फत पाहणी करण्यात यावी, जे रस्ते शेतकऱ्यांच्या समन्वयाने सोडवणे शक्य आहे याबाबत माहिती प्राप्त करून घेणे.
त्यानंतर मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने व शेतकऱ्यांच्या समन्वयाने सोडविण्यात येईल अशा रस्त्याबाबत यादी बनवा असे त्यांनी संगितले आहे.
त्यानंतर रस्ता अदालतचे आयोजन करून त्याबाबत आदेश पारित करा असेही सांगितले आहे.
नंतर प्रलंबित राहिलेले रस्त्यांची संख्या निश्चित करावी व नियमानुसार कार्यवाही करावी असे सांगितले आहे. या रस्त्यांच्या मोजणीसाठी मोजणी शुल्क आकारले जाऊ नये असे परिपत्रक काढले आहे.
शेतकऱ्यांत आनंद
या परिपत्रकामुळे जिल्हाभरातील शेतकर्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच शेतकऱ्यांचा पिढ्यानपिढ्या चाललेला संघर्ष संपेल व न्याय मिळेल अशी भावना आता शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.