तिसगाव शहरालगत असलेल्या वनदेव परिसरात एका सुवर्णकार व्यावसायिकाच्या मुलाला सहा ते सात जणांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ चित्रीकरण करून आरोपींनी आपल्या दहशतीचा पुरावा ठेवला. शुक्रवारी (१४ मार्च) ही घटना घडली असून, या हल्ल्यात तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
पाथर्डी-तिसगाव रोडवरील एका हॉटेलसमोर जखमी तरुणाचा दुसऱ्या एका तरुणासोबत वाद झाला. काही वेळाने त्या तरुणाने जखमी तरुणाला वनदेव परिसरात नेले, जिथे आधीच पाच ते सहा जण दबा धरून बसले होते. या टोळक्याने लाकडी दांडके, वायर आणि दगडाने त्या तरुणावर हल्ला केला. मारहाणीनंतर आरोपी पळून गेले.

या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाने वडिलांना संपर्क करून घटनास्थळी बोलावले. त्यानंतर त्याला उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
मारहाण करणाऱ्या तरुणांनी जखमीच्या कुटुंबीयांना धमकी दिली की, पोलिसात तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. परिणामी, पालकांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला आहे.
या घटनेमुळे वनदेव परिसरातील गुंडगिरीबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. जर अशा घटनांवर वेळीच नियंत्रण आणले नाही, तर भविष्यात मोठ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळू शकते.