अहिल्यानगरमध्ये धक्कादायक घटना! रूग्णालयात उपचार घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर डाॅक्टरनेच केला अत्याचार! रुग्णालयाची तोडफोड

संगमनेरात डॉक्टर कर्पे याने १६ वर्षीय मुलीवर हॉस्पिटलच्या टेरेसवर अत्याचार केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून दहा दिवसांची कोठडी सुनावली आहे. ठाकरे सेनेने रुग्णालयासमोर आंदोलन करत तोडफोड केली.

Published on -

संगमनेर- शहरात एका धक्कादायक घटनेनंतर जनक्षोभ उफाळून आला आहे. येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या १६ वर्षीय कनिष्ठ महाविद्यालयीन मुलीवर रुग्णालयातील डॉक्टरनेच अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या गंभीर प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयावर मोर्चा काढत तोडफोड केली. विशेष म्हणजे, या आंदोलनात महिलांचा आक्रमक सहभाग विशेषत्वाने जाणवला.

गुन्हा दाखल

ही घटना रविवारी (६ एप्रिल) पहाटेच्या सुमारास घडली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात डॉक्टर अमोल कर्पे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी डॉक्टरला नाशिक येथून अटक केली. सोमवारी (७ एप्रिल) त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

रूग्णालयासमोर आंदोलन

या घटनेमुळे संतप्त ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी रुग्णालयासमोर जोरदार आंदोलन केले. या वेळी रुग्णालयाची तोडफोड झाली, आणि कार्यकर्त्यांनी कडक स्वरात निषेध व्यक्त केला. “अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा,” अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.

संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, माजी शहरप्रमुख अमर कतारी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांचाही सहभाग होता.

मुख्यमंत्र्यांकडे मागणीपत्र

या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन पाठवण्यात आले. त्यात पीडित मुलीला त्वरित न्याय मिळावा, आरोपीवर जलद गतीने खटला चालवून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

ही घटना केवळ पीडित कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी धक्कादायक आहे. एका रुग्णालयात, जेथे उपचार व संरक्षणाची अपेक्षा केली जाते, तेथेच असा अमानुष प्रकार घडल्याने वैद्यकीय क्षेत्रावर विश्वास डळमळीत झाला आहे. या प्रकरणातील चौकशी, न्यायालयीन प्रक्रिया आणि शासनाची भूमिका याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

या प्रकारामुळे वैद्यकीय व्यवसायातील नैतिकतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत जनआंदोलनाची शक्यता कायम आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News