वैभव नायकोडी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर… एकाच दिवशी दोघांचे

Published on -

अहिल्यानगरमध्ये झालेल्या वैभव नायकोडी हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला असून, आरोपींनी एका दिवसात दोन तरुणांचे अपहरण केले होते, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींवर आता अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपहरण करून अमानुष मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

संदेश भागाजी वाळुंज (वय १९, रा. सम्राटनगर, चेतना कॉलनी, एमआयडीसी) हा या प्रकरणातील दुसरा पीडित असून, त्यालाही आरोपींनी वैभव नायकोडीसोबतच २२ फेब्रुवारी रोजी अपहरण केले होते.

अनिकेत ऊर्फ लपका सोमवंशी, नितीन नन्नवरे, महेश पाटील, सॅम ऊर्फ सुमित थोरात, करण सुंदर शिंदे, विशाल कापरे, रोहित गोसावी, सोनू घोडके (सर्व रा. अहिल्यानगर) या नऊ आरोपींविरुद्ध खंडणीसाठी अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२१ फेब्रुवारी रोजी आरोपींनी संदेश वाळुंज आणि वैभव नायकोडीला जबरदस्तीने कारमध्ये टाकून गोल्डन सिटी परिसरातील चेंबरमध्ये डांबले. तिथे त्यांचे कपडे उतरवून अमानुष मारहाण करण्यात आली.

नंतर रात्री दोघांना चेतना कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये हलवले गेले आणि पुन्हा छळ करण्यात आला. यात वैभव नायकोडीचा मृत्यू झाला, तर संदेश वाळुंजला धमकी देऊन सोडण्यात आले. आरोपींनी त्याला माहिती इतरांना दिल्यास संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली होती.

राहुल पाटीलला मारायचं होतं, पण सापडला लपका

१९ जानेवारी रोजी झालेल्या वादातून राहुल पाटील आणि त्याचा भाऊ महेश पाटील यांना मारण्यासाठी अल्पवयीन मुलगा आणि त्याचा साथीदार गेले होते. मात्र, तिथे महेश पाटील पळून गेला आणि अनिकेत उर्फ लपका सोमवंशी हाती लागला.त्याला अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदारांनी कोयत्याने गंभीर जखमी केले. हा प्रकार गँग वॉरच्या भागासारखा असल्याचे स्पष्ट होत आहे.

या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी दुसऱ्या टोळीचा म्होरक्या असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच, अभिषेक रंजित भोसले (रा. बीड) आणि प्रतीक पवार (रा. मोरया पार्क, गांधीनगर) यांना अटक करण्यात आली आहे. या नव्या अटकेमुळे संपूर्ण गुन्ह्याचा तपास आणखी गडद होत असून, हा प्रकार गँग वॉरशी संबंधित असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

या प्रकारामुळे शहरात टोळी युद्धाची दहशत निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. संदेश वाळुंजच्या जबाबावरून या गुन्ह्याच्या मागे आणखी मोठी कटकारस्थान असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe