अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- ‘प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका मुलीचा प्रेमात आकंठ बुडाला. मात्र ती मुलगी बुध्दीमान निघाली.
‘तुला सरकारी नोकरी मिळाली तरच मी तुझ्याशी लग्न करील, तेव्हा तू सरकारी नोकरीसाठी प्रयत्न कर. अन्यथा माझे आईवडील माझं तुझ्याऐवजी सरकारी नोकरी असलेल्या दुसर्याच मुलाशी लावून देतील’, अशी तंबीच त्या मुलीने या आंधळ्या प्रेमविराला दिली.

मग काय, त्याच्या मनात एकच, कसंही करुन लष्करात नोकरी मिळाल्याचं त्या मुलीला खोटं पण रेटून बोलत सांगायचं या पठ्ठ्यानं ठरविलं. यासाठी त्याने भिंगारमधून फौजी जवानाचा गणवेश खरेदी केला, तो परिधान केला आणि त्या मुलीला व्हिडिओ काॅल केला.
तरीही त्या बुध्दीमान मुलीचा विश्वास बसला नाही. तिने त्याला सांगितले, ‘तू मिल्ट्री एरियामध्ये जाऊन व्हिडिओ काॅल कर’. त्या आंधळ्या प्रेमविरानं तसंच केलं आणि तिथंच तो फसला. लष्करी अधिकारी आणि जवानांनी पकडलं.
त्या आंधळ्या प्रेमविराकडे कुठलंही ओळखपत्र नसल्यानं लष्करी अधिकार्यांना तो संशयित दहशतवादी वाटला. लष्करी अधिकार्यांनी त्या प्रेमविराला लष्कराच्या खास तुरुंगात ठेवलं आणि त्याची ‘कसून’ चौकशी केली. मात्र स्वत:ची ओळख पटविण्यात तो असफल ठरला आणि लष्करी अधिकार्यांनी दहशतवादी सापडल्याचा भिंगार कँप पोलिसांनीना फोन केला.
भिंगार कॅप पोलीस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आंधळ्या प्रेमविराला पोलीस ठाण्यात आणलं गेलं आणि ‘पोलीसी खाक्या’ दाखवताच तो पोपटासारखं बोलू लागला.
उत्तर नगर जिल्ह्यातल्या लोणीचा राहणारा तो तरुण चांगल्या घरचा आहे. मात्र प्रेमात आंधळा झाल्यानं त्या तरुणानं हे पाऊल उचललं. सरकारी नोकरी नाही आणि जिच्यावर प्रेम जडलं तिनं तर पहिली अट सरकारी नोकरी असल्याची ठेवली. त्या मुलीची ती अट पूर्ण करण्यासाठी या प्रेमविरानं लष्करातला ‘मुन्नाभाई’ बनायचं ठरविलं आणि शेवटी तो दहशतवादी बनून गजाआड गेला.
विशेष म्हणजे लष्करात नोकरी लागल्याची त्या प्रेमवेड्याने मित्रांंना पार्टीदेखील दिली. त्या मुलीला ‘इंप्रेस’ करण्यासाठी आणि तिचं प्रेम प्राप्त करण्यासाठी वाट्टेल करण्याची त्या प्रेमवेड्यानं तयारी केली. मात्र हाय रे कर्मा! नशिबानं त्याला दगा दिला आणि त्या मुलीसोबत संसाराच्या बेडीत अकडण्याऐवजी त्या प्रेमवेड्या तरुणाला कायद्याच्या आणि पोलिसांच्या बेडीत अडकावं लागलं.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम