Ahmednagar News : जिल्ह्यातील आश्रमशाळांत धक्कादायक प्रकार सुरूच ! अधीक्षकाने महिला कर्मचाऱ्यास बेदम मारले..

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आश्रमशाळा आहेत. परंतु अनेक ठिकाणी वेगळेच धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. आता अकोले तालुक्यातील खडकी येथील शासकीय आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या आश्रमशाळेतील अधीक्षक राजेश दगडू डुबे याने आश्रमशाळेतील कर्मचारी महिलेस मारहाण केली आहे. हा प्रकार शाळेतील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर घडला. महिलेस जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केल्याची तक्रार सदर कर्मचारी महिलेने पोलिसांत दाखल केली आहे. ही घटना शुक्रवारी (१५ डिसेंबर) दुपारी १२ वाजता घडली.

तक्रारीत म्हटले आहे की, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण वाढत असताना आरोपी खडकी आश्रमशाळेतील अधीक्षक राजेश दगडू डुबे तेथे आला. डुबे याने विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर गैरवर्तन केले,

जातीवाचक शिविगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी कर्मचारी महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी राजेश दगडू डुबे (रा. खडकी, ता. अकोले) याच्यावर राजूर पोलिस ठाण्यात अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कलमासह फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

मागील काही दिवसात काही आश्रमशाळेतील अनेक अशा धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे बऱ्याचदा पालकांत देखील रोष ओढवतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe