शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात जोरदार मोहीम राबवण्यात आली असून, प्रशासनाने १६ जिल्हे आणि ५ राज्यांतील जवळपास ७५ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, या भिक्षेकऱ्यांमध्ये एक सेवानिवृत्त सहायक फौजदार, एक उच्चशिक्षित इंग्रजी बोलणारा तरुण, तसेच कर्ज फेडण्यासाठी भीक मागणारी एक आईदेखील आढळली आहे.शिर्डीत वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, शिर्डी नगरपंचायत आणि साईबाबा संस्थान संयुक्तपणे कारवाई करत आहेत.
गेल्या काही दिवसांत शिर्डीत गुन्हेगारी आणि भाविकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे, पोलिस प्रशासन, शिर्डी नगरपंचायत आणि साईबाबा संस्थान ॲक्शन मोडमध्ये आले असून, शहरातील अवैध आणि त्रासदायक भिक्षेकऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.

गुरुवारी सकाळपासून शिर्डी पोलिस, साई संस्थान आणि नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे मोहीम राबवत, साई मंदिर परिसरातील ७५ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले.भिक्षेकऱ्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण होत असल्याने आणि काही मद्यधुंद अवस्थेत भाविकांना त्रास देत असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली.
पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी आणि नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली या भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
१६ जिल्हे आणि ५ राज्यांतील भिक्षेकरी
या विशेष मोहिमेत अहिल्यानगर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, वाशिम, जळगाव, अकोला, बुलढाणा, नांदेड, जालना, बीड, सांगली, सोलापूर, यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यांतील तसेच कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील भिक्षेकरी सापडले. काही भिक्षेकरी संपूर्णपणे कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे भीक मागत होते. तर काहीजण भीक मागण्याला व्यवसाय बनवत मोठ्या प्रमाणात पैसे कमवत असल्याचे उघड झाले.
निवृत्त सहायक फौजदार
या कारवाईदरम्यान, एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली – एक निवृत्त सहायक फौजदारही भिक्षेकऱ्यांमध्ये आढळला!तो मुंबई पोलिस दलातून निवृत्त असून, त्याच्या खात्यावर १० ते १५ लाख रुपये असल्याची माहिती मिळाली. तथापि, तो शिर्डीत भीक मागत असल्याने पोलिसही आश्चर्यचकित झाले आहेत.
उच्चशिक्षित तरुण भिक्षेकऱ्यांमध्ये!
याशिवाय, भिवंडी येथील एक उच्चशिक्षित तरुणही भिक्षेकऱ्यांमध्ये सापडला.त्याने पोलिस आणि अधिकाऱ्यांशी अस्खलित इंग्रजीत संवाद साधला.
कर्ज फेडण्यासाठी भीक मागणारी आई
अजून एक संवेदनशील बाब म्हणजे, एका महिलेने आपल्या सून आणि लेकावरील कर्ज फेडण्यासाठी भीक मागण्याचा निर्णय घेतला होता.ही आई आपल्या कुटुंबाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी शिर्डीत भिक्षेकरी बनली होती. तिची परिस्थिती पाहून अनेकांना हळहळ वाटली.