Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात गोळीबार !

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीच्या घटना जास्त प्रमाणात घडताना दिसत आहेत. आता नगर तालुक्यातील चास मध्ये गोळीबार झाला आहे. या मागील कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

चास (ता. नगर) शिवारात पाईपलाईन फोडल्याच्या कारणावरून हा सगळा ‘राडा’ झाला आहे. यात एकाने घरासमोरील झाडामध्ये गोळीबार करत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना मंगळवारी (दि. २३) सायंकाळी घडली.

याप्रकरणी रात्री उशिरा नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय सिताराम रासकर (रा. चास) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पद्माबाई संतोष रासकर (वय ४५ रा. चास) यांनी फिर्याद दिली असून पोलीस तपास करत आहेत.

अधिक माहिती अशी : संजय याने मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पद्माबाई यांच्या घरासमोर येऊन पाईपलाईन फोडल्याच्या कारणांवरून शिवीगाळ केली. संजय याने त्याचा भाऊ महादेव सिताराम रासकर याच्या नावाने लायसन्स असलेली बंदुक सोबत आणली होती.

दहशत करण्याच्या उद्देशाने संजय याने बंदुकीतून पद्माबाई यांच्या घरासमोरील झाडात गोळीबार केला. ‘तुम्ही जर आमची परत पाइपलाइन फोडली तर तुम्हाला जीवे ठार मारून टाकू’, अशी धमकी दिली. या प्रकरणाने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

या गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले, नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती घेतली. दरम्यान आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News